उपनगरात पुन्हा ओपन बार जोमात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:29 AM2021-02-17T04:29:08+5:302021-02-17T04:29:08+5:30
अमर पाटील कळंबा : दक्षिणच्या उपनगरातील तपोवन मैदानावर, हॉकी स्टेडियम मैदानाच्या प्रेक्षक गॅलरीत, राजोपाध्येनगरातील क्रीडांगण, ...
अमर पाटील
कळंबा : दक्षिणच्या उपनगरातील तपोवन मैदानावर, हॉकी स्टेडियम मैदानाच्या प्रेक्षक गॅलरीत, राजोपाध्येनगरातील क्रीडांगण, कळंबा तलाव परिसरात, रंकाळा खणविहार परिसर, रंकाळा जुना वाशी नाका उद्यानात, नाळे कॉलनी उद्यान, रिंगरोड पेट्रोलपंपालगतच्या खुल्या जागेत, साळोखेनगरातील पाण्याची टाकी, पुईखडी जलशुद्धीकरण केंद्राच्या परिसरात सद्या ओपन बार जोमात सुरू आहे. मध्यंतरी पोलिसांनी कडक कारवाई करत कारवाईत सातत्य ठेवल्याने ओपन बार तात्पुरते बंद झाले होते. आता पुन्हा असे प्रकार वाढू लागले आहेत.
उपनगरातील क्रीडांगणे मद्यपान करणाऱ्यांसाठी मोक्याची ठिकाणे बनली असून, येथे मद्याच्या रिकाम्या फोडलेल्या बाटल्यांचा खच पडत आहे. उपनगरातील क्रीडांगणे, उद्याने, बगीचे येथे सराव करणारे खेळाडू असोत वा फिरावयास येणारे नागरिक यांना अस्ताव्यस्त पडलेल्या दारूच्या बाटल्यातून वाट काढावी लागते. येथील विविध परिसरात दररोज रात्री समूहाने प्यायला बसणाऱ्याचे टोळके पाहण्यास मिळते. रस्त्यावरून जाणाऱ्या महिला, युवती व ज्येष्ठ नागरिकांना या मद्यपींचा नाहक त्रास होतो. शिवाय शिवीगाळ सहन करावी लागते .पोलीस प्रशासनाने ओपनबारवर वेळीच कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
...........
शाळेसमोर बार
कळंबा गारगोटी रस्त्यावर एका खासगी मुलींच्या शाळेसमोर अवघ्या काही मीटर अंतरावर परमिट बार असून, सावित्रीच्या लेकींना याचा मोठा त्रास होत आहे. कळंबा ग्रामपंचायत कार्यालयाच्या पाठीमागे आयटीआयसमोर काही अंतरावर बार आहेत. दारू उत्पादन शुल्क विभागाने परवानग्या देताना कोणता अर्थ काढून परवानग्या दिल्या, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे .
..........
बीअरशॉपीत बार
उपनगरातील बिअर शॉपीत विदेशी दारूसुद्धा सर्रास विकली जाते. शिवाय बिअरशॉपीत बिअर पिणाऱ्यांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाच्या कारवाईबाबत शंका उपस्थित होत आहे.
चौका-चौकात दारूचाच महापूर
संभाजीनगर ते कळंबा तलाव मैलाच्या रस्त्यावर पाच बार, दोन बिअरशॉपी, आपटेनगर चौकात समोरासमोर पाच बार, रिंगरोडवर तीन देशी दारू दुकाने अवघ्या मैलाच्या रस्त्यावर, देवकर पाणंद ते साळोखेनगर रस्त्यावर एक बार, दोन बिअर शॉपी, संभाजीनगर ते आपटेनगर रस्त्यावर तीन बार, दोन बिअरशॉपी त्यामुळे अवघ्या काही मैलाच्या परिसरात फक्त दारूचा महापूर दिसत आहे.