दुपारी अक्षताचा मुहूर्त... पै-पाहुणेही जमले, तोपर्यंत कळालं मुलगी...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2021 05:33 PM2021-12-08T17:33:17+5:302021-12-08T17:38:10+5:30
नवरी मुलीस चुडा भरला होता... नवऱ्या मुलाच्या दारात मुहूर्तमेढ सजली होती... सोमवारी रात्री नऊ वाजता साखरपुडा करून घेतला... मंगळवारी दुपारी १ वाजता अक्षताचा मुहूर्त... पै-पाहुणेही जमलेले... तोपर्यंत
कोल्हापूर : नवरी मुलीस चुडा भरला होता... नवऱ्या मुलाच्या दारात मुहूर्तमेढ सजली होती... सोमवारी रात्री नऊ वाजता साखरपुडा करून घेतला... मंगळवारी दुपारी १ वाजता अक्षताचा मुहूर्त... पै-पाहुणेही जमलेले... तोपर्यंत मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती पोलीस पाटील उमेश नांगरे यांना मिळाली व वडणगे (ता. करवीर) येथे होणारा बालविवाह रोखण्यात येथील अवनि संस्थेला यश आले. महानायक अमिताभ बच्चन यांंच्या सहकार्याने सुरु असलेल्या जागर प्रकल्पांतर्गत ही कारवाई करण्यात आली. प्रकल्प समन्वयक प्रमोद पाटील व ग्रामविकास अधिकारी प्रकाश बागुल यांनी ही माहिती दिली.
असा विवाह होणार असल्याची माहिती पोलीसपाटील यांना पहाटे सहा वाजता समजली. त्यांनी अवनि संस्थेला त्याबाबत कळविले. त्यानुसार अवनिच्या अध्यक्षा अनुराधा भोसले व बालकल्याण समितीच्या सदस्या ॲड. दिलशाद मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली मुलीच्या घरी भेट देण्यात आली. मुलीचे वय १५ वर्षे ३ महिने व २९ दिवस होते. तिच्या वडिलांचे निधन झाले आहे. मुलीचे गावातील एका २४ वर्षाच्या मुलावर प्रेम आहे. म्हणून मुलीच्या संमतीनेच दुपारी एक वाजता लग्न होणार होते. भटजीसह अक्षताही तयार होत्या.
परंतु संस्थेच्या कार्यकर्त्यांनी दोन्ही कुटुंबातील लोकांना या गंभीर गुन्ह्याबद्दल माहिती दिली. आता तुम्ही लग्नात विघ्न आणू नका... आम्ही अक्षता टाकून घेतो व मुलगी सज्ञान होईपर्यंत माहेरीच ठेवतो, असे त्यांचे म्हणणे होते. परंतु अवनिच्या कार्यकर्त्यांनी ते धुडकावून लावले. मुलीसह दोन्ही कुटुंबातील प्रमुखांना दुपारी तीन वाजता बालकल्याण समितीसमोर हजर करण्यात आले. तिथे त्यांना बालविवाह प्रतिबंधक कायद्याची माहिती देण्यात आली. त्यांच्याकडून मुलगी सज्ञान (१८ वर्षे पूर्ण) होईपर्यंत लग्न करणार नाही, असे लेखी बंधपत्र घेतले. तसा प्रकार घडल्यास रितसर गुन्हा नोंद केला जाईल, असे स्पष्ट करण्यात आले. त्याची जबाबदारी ग्रामविकास अधिकारी यांच्यावर सोपवण्यात आली. या मोहिमेत गावचे पोलीसपाटील यांच्यासह सिध्दांत घोरपडे, चाईल्ड लाईन हेल्पलाईन व करवीर पोलिसांची मदत झाली.
संवेदनशील गाव तरीही...
कोल्हापूर शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेले वडणगे हे गाव राजकीय - सामाजिकदृष्ट्या अत्यंत संवेदनशील आहे. तरीही मागील वर्षात गावातील तीन बालविवाह रोखण्यात आले आहेत. बालविवाह करू नयेत, यासाठी प्रबोधनात्मक चार कार्यक्रम अवनि संस्थेने घेतले. पथनाट्य करूनही लोकांत जागृती करण्याचा प्रयत्न केला, तरीही पुन्हा बालविवाहाचा प्रयत्न झाला. अशा कृत्यांना आता गावानेच पायबंद घालण्याची गरज आहे.