जेईई अॅडव्हान्स परीक्षेत कोल्हापूरच्या विद्यार्थ्यांचे यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2020 10:54 AM2020-10-06T10:54:39+5:302020-10-06T10:57:52+5:30
Success of Kolhapur students, JEE Advance Examination, education इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) सारख्या अग्रगण्य केंद्रीय अभियांत्रिकी शिक्षण संस्थांमधील प्रवेशासाठी राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आलेल्या जेईई ॲडव्हान्स या सामायिक प्रवेश परीक्षेतही कोल्हापुरातील विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे.
कोल्हापूर : इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) सारख्या अग्रगण्य केंद्रीय अभियांत्रिकी शिक्षण संस्थांमधील प्रवेशासाठी राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आलेल्या जेईई ॲडव्हान्स या सामायिक प्रवेश परीक्षेचा निकाल सोमवारी ऑनलाईन जाहीर झाला. या परीक्षेतही कोल्हापुरातील विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे.
जिल्ह्यातील साधारणत: दहा केंद्रांवर दि. २७ सप्टेंबर रोजी जेईई ॲडव्हान्स परीक्षा ऑनलाईन पद्धतीने झाली. त्यासाठी सुमारे तीन हजार परीक्षार्थी होते. या परीक्षेचा सोमवारी निकाल जाहीर करण्यात आला. त्यात इन्पायर अकॅडमीच्या सहा विद्यार्थ्यांनी यश मिळविले.
यामध्ये प्रसाद भोसले, सत्यम पाटील, आदित्य कदम, यश चिंचोलकर, मिलिंद माळी, सतेज कोपार्डे यांचा समावेश आहे. चाटे शिक्षण समूहाच्या बारा विद्यार्थ्यांनी बाजी मारली. सर्वग्यान अकॅडमीचे सहा विद्यार्थी यशस्वी ठरले. त्यात दोन मुली आणि चार विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
हे विद्यार्थी आयआयटी प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत. या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी ऑनलाईन निकाल जाणून घेतला. यशस्वीतांवर त्यांचे पालक, नातेवाईक, मित्रमंडळींनी शुभेच्छांचा वर्षाव केला.
जिल्हा परिषद कॉलनीतील ओंकार पाटीलची बाजी
या परीक्षेत कोल्हापूरमधील जिल्हा परिषद कॉलनी येथील ओंकार देवगोंडा पाटील याने राष्ट्रीय पातळीवरील २८७९ रँकसह बाजी मारली आहे. तो आयआयटी प्रवेशासाठी पात्र ठरला आहे. तो जेईई मेन्स परीक्षेत ९९.४४ पर्सेंटाईलने उत्तीर्ण झाला होता. तो डीकेटीई ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी आहे. त्याला डीकेटीईचे अध्यक्ष माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, आमदार प्रकाश आवाडे, सचिव सपना आवाडे, प्राचार्य वरदा उपाध्ये, उपप्राचार्य अतुल पाटील, आदींसह शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.