संघर्षातून यश!

By admin | Published: May 31, 2017 01:17 AM2017-05-31T01:17:40+5:302017-05-31T01:17:40+5:30

बारावी निकाल : अपूर्वा, संध्याचा प्रेरणादायी प्रवास

Success from struggle! | संघर्षातून यश!

संघर्षातून यश!

Next



विद्यार्थांच्या आयुष्यातील ‘टर्निंग पॉइंट’ असलेल्या बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. या परीक्षेत भौतिक साधन सुविधा नसताना तसेच कोणत्याही खासगी क्लासेसचा हातभार न घेता परिस्थितीशी दोन हात करीत विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश निश्चितच प्रेरणादायी आहे.


‘संध्या’चा करिअरला योग्य टच

लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : घरच्या आर्थिक परिस्थितीला हातभार लावण्यासाठी हेअर आणि ब्युटीपार्लरमध्ये काम करून प्रतिराज गार्डन बोंद्रेनगर येथील संध्याकिरण नितीन पोवार हिने बारावीच्या परीक्षेत ८०.७ टक्क्यांसह यश मिळविले आहे.
दहावीची परीक्षा दिल्यानंतर संध्याकिरण हिने आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी हेअर आणि ब्युटीपार्लरमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला. तिने सयाजी हेअर अ‍ॅण्ड ब्युटी अकॅडमीमध्ये दहावीच्या सुटीत तीन महिन्यांचा अभ्यासक्रमपूर्ण करीत मेकअप आणि केशरचनेच्या कामामध्ये प्रावीण्य मिळविले. तिला ८४ टक्के गुण मिळाले. त्यानंतर तिने पार्लरमधील आपले काम सुरू ठेवत महाराष्ट्र हायस्कूल अ‍ॅण्ड ज्युनिअर कॉलेजमध्ये पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतला. त्यानंतर पहाटे चार ते सकाळी सहापर्यंत अभ्यास. सकाळी सात ते साडेअकरापर्यंत कॉलेज. दुपारी बारा ते सायंकाळी सातपर्यंत पार्लरमध्ये काम आणि रात्री नऊ ते अकरापर्यंत अभ्यास असा तिचा दीनक्रम होता. राज्य, जिल्हा पातळीवरील काही वक्तृत्व स्पर्धांमध्ये तिने यश मिळविले आहे.
माझ्या शिक्षण आणि व्यक्तिमत्त्व विकासाला सकारात्मक दिशा काका सयाजी झुंजार यांच्यामुळे मिळाली आहे. माझ्या यशाचे श्रेय त्यांच्यासह वडील नितीन, आई अलका आणि भाऊ निरंजन यांना असल्याचे संध्याने सांगीतले.


अंध ‘अपूर्वा’चे लखलखीत यश
प्रदीप शिंदे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : अंध असूनही यशस्वी जीवनाची स्वप्ने डोळ्यांत साठवून, बारावी परीक्षेत कला शाखेतून ८५.२३ टक्के गुण मिळवून, अपूर्वा माने हिने डोळसांनाही लाजवेल असे आपले स्वप्न प्रत्यक्षात उतरविले.
उचगाव-मणेरमळा येथील वरुण विहार टाउनशिपमध्ये राहणाऱ्या अपूर्वाची दृष्टी शाळेत असतानाच कमी होत गेली. तिच्यावर उपचार करून देखील यश मिळाले नाही. यावेळी घरच्यांच्या सहकार्यातून अंधत्वावर मात करून तिने शिक्षणाची वाट धरली. कमला महाविद्यालयातून बारावीची परीक्षा देताना तिला आई उषाराणी, धाकटी बहीण अर्पिता व वडील कमलाकर यांची विशेष मदत झाली. पुस्तकातील मजकूर, महाविद्यालयातील तासांचे व्याख्यान, इतर मार्गदर्शक पुस्तके यांचे वाचन करून त्यांचे मोबाईलमध्ये रेकॉर्डिंंग करून देण्याचे काम तिच्या घरच्यांनी केले. यामुळे ते ऐकल्याने परीक्षेदरम्यान देण्यात आलेल्या लेखनिकाला प्रश्नांची उत्तरे व्यवस्थित देणे तिला शक्य झाले. परीक्षेचा जास्त ताण न घेता पहाटे व दुपारी वेळ मिळेल तेव्हा ती मोबाईलवरील रेकॉर्डिंग व डीव्हीडी प्लेअरवरही बारावीचा अभ्यास ऐकत असे. घरात स्वत:ची कामे स्वत: करीत तिने बारावीची परीक्षा दिली. अपूर्वाच्या आई उषाराणी या खासगी शिकवणी घेतात. वडील कमलाकर हे एका खासगी कंपनीत नोकरीस आहेत; तर बहीण अर्पिता ही नववीत शिकत आहे. बारावीतील या यशामुळे तिला शुभेच्छा देण्यासाठी घरी नातेवाइकांची गर्दी झाली होती.
मला यापेक्षा जास्त टक्के पडतील अशी अपेक्षा होती. कला शाखेतून पदवी घेऊन स्पर्धा परीक्षेची तयारी करणार असल्याचे अपूर्वांने सांगितले.



हृषिकेशची वडिलांना अनोखी श्रद्धांजली
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : घरची स्थिती तशी बेताचीच... त्यात अचानक आॅगस्टमध्ये वडील वारले. त्यामुळे बारावी करावी की नको अशा विवंचनेत दोन महिने गेले; परंतु झालेले दु:ख पाठीवर टाकून त्याने जिद्दीने अभ्यास केला आणि बारावीच्या परीक्षेत इंग्रजी माध्यमातून कॉमर्समध्ये ९१.५४ टक्के गुण मिळविले. सरनोबतवाडी (ता. करवीर) येथील हृषिकेश प्रदीप भोसले याची ही यशोगाथा. त्याला आता सी. ए. व्हायचे आहे. त्यासाठी त्याला समाजाकडून मदतीची, आधाराची अपेक्षा आहे.
हृषिकेश हा कदमवाडी येथील डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज आॅफ कॉमर्सचा विद्यार्थी आहे. बारावीत गेल्यावर २ आॅगस्टला पोटात जंतुसंसर्ग झाल्याचे निमित्त झाले आणि त्याचे वडील वारले. ते शिरोली औद्योगिक वसाहतीत जॉब वर्कर होते. वडिलांचे निधन झाल्यानंतर कुटुंबाचा आधार गेला. घरी अन्य काही उत्पन्नाचे साधन नाही. आई गायत्री यांनी खासगी नोकरी पत्करली व कुटुंबाचा गाडा हाकायला सुरुवात केली. हृषिकेशने घरातच मोबाईल रिचार्ज करून देण्याचा व्यवसाय सुरू केला. या व्यवसायामुळे त्याला कॉलेजलाही फारसा वेळ देता आला नाही; परंतु तरी त्याने चिकाटीने अभ्यास करून घवघवीत यश मिळविले. त्याला अकौंटन्सी विषयात ९९, तर गणितात ९८ गुण मिळाले आहेत. त्याला मामा, सी.ए. अभिजित कुलकर्णी आणि प्राचार्य ए. बी. पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
वडिलांनी खूप कष्ट घेतले. त्यांच्या कष्टाचे चीज झाले; परंतु हे यश पाहायला ते हवे होते, अशा भावना आई गायत्री भोसले यांनी व्यक्त केल्या. हे सांगताना त्यांच्या डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या.

Web Title: Success from struggle!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.