...अन् दोन वर्षांच्या लढ्याला यश!
By admin | Published: January 8, 2016 11:49 PM2016-01-08T23:49:54+5:302016-01-09T00:45:47+5:30
शासनाच्या निर्णयाने आनंदोत्सव : बैलगाडी शर्यतींवरील बंदी उठली
प्रमोद सुकरे -- कऱ्हाड ग्रामीण भागात लोकप्रिय असलेल्या बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठवावी म्हणून गेल्या दोन वर्षा$ंत प्रामाणिकपणे प्रयत्न केले. भाजप अन् ‘स्वाभिमानी’च्या खासदारांकडे याबाबत ठाम भूमिका मांडली. दहावेळा दिल्लीमध्ये शिष्टमंडळ घेऊन भेटलो. केंद्र सरकारने आज शर्यतीवरील बंदी उठवून बैलगाडी शर्यतप्रेमींना न्याय दिला आहे. दोन वर्षांच्या लढ्याला यश आले. याचा आनंद होत असल्याचे मत अखिल भारतीय बैलगाडी चालक- मालक संघटनेचे अध्यक्ष धनाजी शिंदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.
शिंदे म्हणाले, अनेक राज्यांमध्ये बैलगाडीच्या शर्यती लोकप्रिय आहेत. मात्र, पेटा या प्राणीमित्र संघटनेने शर्यतीदरम्यान बैलांचे हाल केले जाते, अशी भूमिका मांडल्याने काँग्रेस सरकारने शर्यतींवर बंदी घातली होती. मात्र, शेतकरी तर आपल्या मुलांप्रमाणे बैलांची काळजी घेतात हे मत आम्ही पटवून द्यायला यशस्वी ठरलो. म्हणूनच आज केंद्र सरकारने हा चांगला निर्णय घेतला आहे.
पंजाब, हरियाणा, कर्नाटक, तमिळनाडू यांच्याबरोबर महाराष्ट्रातही बैलगाडी शर्यतींना शेतकऱ्यांची पसंती आहे. सातारा जिल्ह्यात तर गावोगावच्या यात्रांमध्ये सुमारे शंभर ठिकाणी बैलगाड्यांचे जंगी आयोजन केले जाते. या शर्यतींसाठी लाखोंची बक्षिसे ठेवली जातात. मात्र, गेली दोन वर्षे या शर्यतीच बंद झाल्याने बैलगाडी शर्यतीप्रेमींच्यात नाराजी झाली होती. याविरोधात शेतकरी रस्त्यावर आले होते. मीही संघटनेच्या माध्यमातून राज्यभर फिरून जागृती करण्याचे काम केले.
तब्बल १९ महिन्यानंतर लढ्याला यश
७ मे २०१४ रोजी बैलगाडी शर्यतीवर बंदी आली होती. त्यानंतर नाराज झालेल्या शौकिनांनी आंदोलनाला सुरूवात केली. मात्र, तत्कालीन सरकारने याची दखलही घेतली नाही. मात्र, ८ जानेवारी २०१६ रोजी ही बंदी उठविण्यात आल्याने गावोगावी फटाक्यांची आतिषबाजी व गुलालाची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला जात आहे.