दोन रुग्णांवर बोन मॅरो ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया यशस्वी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:52 AM2020-12-11T04:52:02+5:302020-12-11T04:52:02+5:30
काेल्हापूर : कॅन्सरवरील अत्यंत अवघड समजली जाणारी उपचारपद्धती असलेली बोन मॅरो ट्रान्सप्लांट (निरोगी अस्थिमज्जांचे प्रत्यारोपण) शस्त्रक्रिया नुकतीच कोल्हापूर कॅन्सर ...
काेल्हापूर : कॅन्सरवरील अत्यंत अवघड समजली जाणारी उपचारपद्धती असलेली बोन मॅरो ट्रान्सप्लांट (निरोगी अस्थिमज्जांचे प्रत्यारोपण) शस्त्रक्रिया नुकतीच कोल्हापूर कॅन्सर सेंटरमध्ये दोन रुग्णांवर यशस्वी पार पडली. पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच अशा पद्धतीची यशस्वी शस्त्रक्रिया केली असल्याची माहिती कोल्हापूर कॅन्सर सेंटरचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. सूरज पवार आणि कार्यकारी संचालक डॉ. रेश्मा पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. यशस्वी उपचार झालेल्या रुग्णांनी या रुग्णालयांत चांगले उपचार मिळाले असून सर्व डॉक्टर देवमाणूस असल्याची भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली. पुढील महिन्यात कोल्हापुरात आणखी दोन प्रत्यारोपण प्रक्रिया होणार आहेत.
डॉ. पवार म्हणाले, कोल्हापूर कॅन्सर सेंटर गेल्या दहा वर्षांपासून कॅन्सर रुग्णांसाठी जीवनदायी ठरले आहे. गेल्या आठ वर्षांपासून कोल्हापूर कॅन्सर सेंटरमध्ये अत्याधुनिक उपचारपद्धतीला महत्त्व देत सुविधा रुग्णांना दिल्या जात आहेत. कॅन्सरवरील अत्याधुनिक उपचार करताना रक्तातील कॅन्सर बरा करणे आणि बोन मॅरो प्रत्यारोपण करणे हे अत्यंत आव्हानात्मक अशी उपचारपद्धती आहे. या आजाराच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी रुग्णाला मुंबई, पुणे, बंगलोर या ठिकाणी जावे लागत होते. मात्र, आता कोल्हापूर कॅन्सर सेंटरमध्ये डॉ. अभिजित गणपुले, डॉ. अनिकेत मोहिते आणि डॉ. नीलेश धामणे या तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली बोन मॅरो ट्रान्सप्लांट उपचारपद्धती यशस्विपणे करण्यात आली.
यावेळी डॉ.गणपुले म्हणाले, या उपचारपद्धतीचा वापर या रक्ताचा कर्करोग अथवा रक्ताच्या इतर आजारांवर होऊ शकतो. यामध्ये सदोष काम करणाऱ्या रोगग्रस्त अस्थिमज्जा पूर्णपणे निकामी करून त्याजागी निरोगी अस्थिमज्जांचे प्रत्यारोपण केले जाते. ही उपचारपद्धती १ महिन्यांपर्यंत चालते. डॉ. मोहिते म्हणाले, कोल्हापूर कॅन्सर सेंटरमध्ये हे उपचार होत असल्याने पश्चिम महाराष्ट्रातील तसेच कोकणातील रुग्णांना याचा फायदा होईल.
डॉ. नीलेश धामणे म्हणाले, दोन्ही रुग्णांना धाप, उलट्या, भूक न लागणे असा त्रास होता. तपासणीनंतर त्यांना कॅन्सरचे निदान झाले. सर्व स्टाफने अथक मेहनत घेतल्यानंतर प्रत्यारोपण यशस्वी झाले.
चौकट
अशी आहे ट्रान्सप्लांट प्रक्रिया
स्टेम सेल्स (मूळ पेशी) देणारा कुटुंबातील भाऊ, बहीण अशा दाता नातेवाईकांमार्फत होते. त्याच्या शरीरातून पेशी घेऊन त्या रुग्णाला चढविल्या जातात. त्यामध्ये दात्याला कोणताही त्रास होत नाही.