युवकासह दोन बालकांवर गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:44 AM2021-03-13T04:44:08+5:302021-03-13T04:44:08+5:30

मूळचा मध्यप्रदेशातील रेवा येथील व सध्या कामानिमित्त कोल्हापुरात वास्तव्यास असलेला अतुल पटेल हा कामानिमित्त सांगलीला दुचाकीवरून गेला होता. यादरम्यान ...

Successful complex surgery on two children, including a teenager | युवकासह दोन बालकांवर गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वी

युवकासह दोन बालकांवर गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वी

Next

मूळचा मध्यप्रदेशातील रेवा येथील व सध्या कामानिमित्त कोल्हापुरात वास्तव्यास असलेला अतुल पटेल हा कामानिमित्त सांगलीला दुचाकीवरून गेला होता. यादरम्यान त्याचा अपघात झाला. या अपघातात त्याच्या पोटाला व डोक्यास मार लागला. जेथे कामास होता त्या मालकाने त्याला प्रथम खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील उपचार खर्च परवडणारा नसल्याने सीपीआर रुग्णालयात दाखल केले. अत्यंत गंभीर अवस्थेत दाखल झालेल्या या युवकाचे सिटी स्कॅन व अन्य तपासण्या केल्यानंतर त्याच्या पोटात अंतर्गत रक्तस्त्राव झालेला व डाव्या बाजूचे मूत्रपिंड तुटून मागील बाजूस गेले होते. त्यामुळे अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करावी लागणार होती. याची कल्पना त्याच्यासह नातेवाईक, मित्रांना दिली. त्याच्यावर तीन तासांची शस्त्रक्रिया करून त्याचे तुटलेले मूत्रपिंड काढले. रक्तस्त्रावामुळे आतड्यांना सूज आली होती. त्यामुळे शस्त्रक्रियेनंतर पोट बंद करता येत नव्हते. ते कृत्रिम पडद्याने बंद करण्यात आले. पाच दिवस व्हेंटिलेटरवर असलेला रुग्ण कालांतराने बरा झाला. सत्तर दिवसांच्या उपचारानंंतर हा रुग्ण पूर्ण बरा झाला आहे.

कार्तिक तावणकर हा दीड महिन्याचा बालक १६ जानेवारी २०२१ ला रत्नागिरीहून सीपीआरमध्ये उपचारासाठी दाखल झाला. तपासण्याअंती त्या मुलाच्या डाव्या बाजूला छातीच्या पडद्यामध्ये जन्मजात छिद्र होते. त्यातच आतडी, जठाराचा भाग छातीमध्ये सरकला होता. त्यामुळे डाव्या बाजूचे फुफ्फुस नीट काम करीत नव्हते. त्याच्यावरही दुसऱ्यादिवशी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याचे डावे मूत्रपिंड, जठर, मोठ्या आतड्यांचा भाग पोटामध्ये पूर्ववत बसविण्यात आला. पाच सेंटिमीटरचे छिद्रही बंद करण्यात आले. हे बालकही १४ दिवसांच्या उपचारानंतर सुखरूप घरी गेले. या सर्व शस्त्रक्रिया डाॅ. कौस्तुभ मिंच, डाॅ. शिवप्रसाद हिरुगडे व त्यांचे सहकारी डाॅ. मधुर जोशी, डाॅ. सुप्रिया बागुले, भूलतज्ज्ञ डाॅ. प्रदीप राऊत यांनी यशस्वी केल्या.

चौकट

चोवीस दिवसांच्या बालिकेवरही यशस्वी शस्त्रक्रिया

मालवणहून सीपीआरमध्ये २४ दिवसांचा निळसर पडलेली बालिका उपचारासाठी बुधवारी (दि. १०) दाखल झाली. तपासणीअंती फुफ्पुसामध्ये गाठी निर्माण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे श्वास घेण्यास तिला अडचण निर्माण झाली होती. फुफ्फुसाच्या वाढीमध्ये दोष असल्याने तो भाग काढणे गरजेचे होते. त्या बालिकेवरही शस्त्रक्रिया करून तो भाग काढला. बालिकेची अत्यंत नाजूक स्थिती आणि गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी झाली. ही बालिकाही सुखरूप आहे. येत्या दोन दिवसांत तिलाही घरी सोडले जाणार आहे.

फोटो : १३०३२०२१-कोल-अतुल पटेल (रुग्ण)

ओळी : अपघातात जखमी झालेल्या अतुल पटेलवर सीपीआरमध्ये गुंतागुतीची शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली.

Web Title: Successful complex surgery on two children, including a teenager

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.