कोल्हापुरात शिवजयंतीची जय्यत तयारी; भव्य मिरवणुकांचे आयोजन, अमित शहांच्या हस्ते होणार उद्घाटन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2023 11:49 AM2023-02-13T11:49:22+5:302023-02-13T11:55:42+5:30
यंदा कणेरी येथील सिद्धगिरी मठातर्फेही प्रथमच भव्य मिरवणूक काढण्यात येणार
कोल्हापूर : अवघ्या सात दिवसांवर येऊन ठेपलेल्या शिवजयंती उत्सवाची तयारी शहरात मोठ्या उत्साहाने सुरू आहे. वातावरणही शिवमय झाले आहे. विशेषतः मिरजकर तिकटी येथे २० फुटी सह्याद्रीचा कडा, तर उभा मारुती चौकात गडकोट ऐतिहासिक कमान बनविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
मिरजकर तिकटीवरील मावळा ग्रुपच्या वतीने यंदा २५ बाय २५ असा भव्य सह्याद्रीचा कडा आणि त्यावरील मावळे असा देखावा उभारण्याचे काम सुरू आहे, तर गुरुवारी (दि.१६) छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ मूर्तीही मिरवणुकीने स्थानापन्न केली जाणार आहे. याशिवाय दि. १७ ते १९ फेब्रुवारीदरम्यान प्रतापगडचा शिवसंग्राम हे नाटक रोज पाच शो याप्रमाणे मावळा ग्रुपचे कलाकार शिवभक्तांसाठी सादर करणार आहेत.
ज्येष्ठ विचारवंत अ. ह. साळुंखे यांचा शाहू छत्रपती यांच्या हस्ते मावळा गौरव पुरस्कार देऊन सत्कार केला जाणार आहे. याशिवाय कोल्हापूरच्या महिला फुटबाॅलपटू, खेलो इंडियात चमकदार कामगिरी केलेल्या खेळाडूंचाही विशेष गौरव केला जाणार आहे. राजर्षी शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वीस फुटी कटाउट ही उभारणीचे काम सुरू आहे.
शिवाजी तरुण मंडळाच्या वतीने यंदा उभा मारुती चौकात ऐतिहासिक गडकिल्ल्याची भव्य प्रतिकृती असलेली कमान उभारणीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. काम पूर्ण झाल्यानंतर आकर्षक विद्युत रोषणाई केली जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा मिरवणुकीने आणून स्थानापन्न केला जाणार आहे. याशिवाय अन्य ठिकाणीही शिवजयंती उत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. भगवे झेंडे, फेटे आणि उपरणे विक्री स्टाॅलही महाद्वाररोड, पापाची तिकटी, लक्ष्मीपुरी, बिंदू चौक आदी परिसरात जागोजागी उभारण्यात आले आहेत.
भव्य मिरवणुकांची तयारी
शिवाजी पेठेतील शिवाजी तरुण मंडळातर्फे येत्या रविवारी शिवजयंती दिनी पारंपरिक पद्धतीने मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा कणेरी येथील सिद्धगिरी मठातर्फेही प्रथमच भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीत पारंपरिक वाद्यासह देशातील अनेक राज्यांतील वाद्य पथकांचा समावेश राहणार आहे. या मिरवणुकीची सुरुवात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे.