शरीराबाहेर मेंदूच्या पेशी वाढवून यशस्वी संशोधन
By Admin | Published: August 23, 2016 12:02 AM2016-08-23T00:02:50+5:302016-08-23T00:35:09+5:30
आशिष देशमुख : शिवाजी विद्यापीठात साकारली पेशीसंवर्धन प्रयोगशाळा
कोल्हापूर : शरीराबाहेर आणि कृत्रिम वातावरणात मेंदूच्या पेशी वाढवून त्यांच्यातील बदलाबाबत संशोधन यशस्वीरित्या शिवाजी विद्यापीठात होत आहे. विद्यापीठातील प्राणिशास्त्र अधिविभागातील प्रा. डॉ. आशिष देशमुख यांनी हे संशोधन केले असून त्यांच्या संशोधन प्रकल्पातून विद्यापीठात पेशी संवर्धन प्रयोगशाळा साकारली आहे. या प्रयोगशाळेच्या रचनेची, प्रयत्नपूर्वक जतन केलेल्या निर्जंतुक वातावरणाची पुण्यातील राष्ट्रीय कोशिका संशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञांनी प्रशंसा केली आहे.
या प्रयोगशाळेत डॉ. देशमुख पांढऱ्या उंदराच्या मेंदूच्या पेशी वाढवून त्यांना विविध प्रकारचे ताण देऊन आणि त्यातील बदलांची तुलना ताण न दिलेल्या पेशीसमवेत करतात. यात पेशींच्या रचनेमध्ये होणारे बदल, त्यांचे आयुष्यमान यांचा सूक्ष्मदर्शकाखाली अभ्यास करतात. तसेच पेशींमध्ये होणाऱ्या जैवरासायनिक बदलांचाही ते अभ्यास करतात.
प्रयोगशाळेतील कृत्रिम वातावरणात जगणाऱ्या पेशी केवळ एकाच प्रकारच्या असल्याने त्यांच्या आणि मेंदूमध्ये जगणाऱ्या पेशींच्या चयापचयामध्ये निश्चितपणे फरक असतो. शरीरांतर्गत पेशींचे चयापचय शरीरातील अन्य पेशींच्या स्रावानुसार बदलत असते. त्यामुळे प्रयोगशाळेतील पेशींमध्ये मिळालेली निरीक्षणे प्रत्यक्षात मेंदूमध्ये मिळतात का, याबाबतसुद्धा डॉ. देशमुख संशोधन करतात.
त्यांच्या संशोधन कार्यासाठी केंद्र शासनाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने २६ लाख ५० हजार रुपयांचे, तर विद्यापीठ अनुदान आयोगाने १२ लाख ३८ हजार रुपयांचे अनुदान शिवाजी विद्यापीठाला दिले आहे. मेंदूच्या पेशींशिवाय फायब्रोब्लास्ट, बोन मॅरो स्टेम सेल्स, रक्तातील पांढऱ्या पेशींचे प्रयोगशाळेत संवर्धनही त्यांनी केले आहे. त्यांच्या पेशीसंवर्धनातील संशोधनामुळे विद्यापीठाची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे.
संवर्धन कौशल्य विकासाचे ध्येय
सी. टी. स्कॅन, एमआरआय, एफएमआरआय, आदी अत्याधुनिक तंत्रज्ञानात मेंदूची रचना, रक्तस्राव, सूज, आदींबाबतचे अचूक निदान करण्याची क्षमता असली, तरी एकेक स्वतंत्र पेशीची रचना दिसण्याच्या मर्यादा यात आहेत, असे डॉ. देशमुख यांनी सांगितले. ते म्हणाले, मूलभूत संशोधनामध्ये प्रयोगशाळेत पेशी वाढविल्यास त्यांचे सूक्ष्मदर्शकाखाली जिवंत अवस्थेत निरीक्षण करता येते. तसेच पेशी पातळीवर होत असलेल्या बदलांचा अभ्यास करणे सुकर जाते.
संशोधनकार्यात मला न्यू कॉलेजमधील प्राणिशास्त्र विभागप्रमुख डॉ. कविता गाजरे-देशमुख यांची मदत होत आहे. पेशीशास्त्रातील मूलभूत संशोधन करणाऱ्या जगभरातील अनेक प्रयोगशाळांमध्ये पेशी संवर्धन करण्यासाठी कौशल्यप्राप्त मनुष्यबळाची गरज आहे.
ते लक्षात घेऊन पदवीधर, पदव्युत्तर विद्यार्थ्यांमध्ये पेशीसंवर्धनाचे कौशल्य विकसित करण्याचे माझे ध्येय आहे. त्यासाठी प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शनपर कार्यशाळा घेण्याचा मानस आहे.
पेशी वाढविण्याची प्रक्रिया अशी
मेंदूच्या पेशी प्रयोगशाळेत वाढविण्याची प्रक्रिया किचकट असते, असे डॉ. देशमुख यांनी सांगितले. ते म्हणाले, या प्रक्रियेत उंदराच्या गर्भावस्थेतील १७ व्या दिवशी गर्भाच्या मेंदूतून या पेशी काढून त्या विशिष्ट प्रकारच्या आच्छादन केलेल्या काचेच्या चकत्यांवर पेरल्या जातात.
या चकत्या विशिष्ट प्रकारच्या प्लास्टिक प्लेटस्मध्ये मेंदूच्या पेशींच्या वाढीस अनुकूल असलेले घटक, पोषक द्रव्य घालून कार्बन डायआॅक्साईड इन्क्युबेटरमध्ये नियंत्रित आणि निर्जंतुक वातावरणात वाढविल्या जातात.