आईने किडनी दिल्यामुळे मुलगीला पुनर्जन्म !-- कोल्हापुरात यशस्वी शस्त्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2017 12:00 AM2017-09-01T00:00:06+5:302017-09-01T00:03:58+5:30
भरत बुटाले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : पोटच्या मुलीच्या दोन्हीही किडण्या (मूत्रपिंड) निकामी झाल्याचे डॉक्टरांकडून समजताच माउलीने आपली एक किडनी तिला दिली आणि तिचा जीव वाचविला.६२ वर्षीय मालुताई राजाराम पाटील (रा. शिरोली दु।।, ता. करवीर) असे त्या माउलीचे नाव आहे.मालुताई पाटील यांची मुलगी संगीता यांचा विवाह खोची (ता. हातकणंगले) येथील संपत पाटील यांच्याशी १९९८ मध्ये झाला आहे. आर्थिक परिस्थिती बेताचीच असलेले पाटील कुटुंबीय अल्पशा उत्पन्नावर गुजराण करीत आहे. दरम्यान, गेल्या सात-आठ महिन्यांपासून हात-पाय सारखे सुजू लागल्यामुळे संगीता यांना अस्वस्थ वाटू लागले होते.
गावात किरकोळ उपचारानंतर त्यांना सीपीआरमध्ये दाखल केले. काही चाचण्या घेतल्यानंतर संगीता यांच्या किडण्या निकामी झाल्याचे निदान झाले. तेथे महिनाभर उपचार घेतल्यानंतर त्यांना कोल्हापुरातीलच खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. या रुग्णालयामध्ये
गेली पाच महिने त्या डायलेसिसवर होत्या. दरम्यानच्या काळात डॉक्टरांनी रुग्णाला कोणत्याही परिस्थितीत एकतरी किडनी बसविणे आवश्यक असल्याचे सांगितले. त्यावेळी आई मालुताई या क्षणाचाही विचार न करता आपली एक किडणी देण्यास तयार झाल्या.
किडणी प्रत्यारोपणासाठी दोघींनाही तातडीने कºहाड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. गेल्या रविवारी आॅपरेशन करून मालुताई यांची एक किडणी संगीता यांना बसविण्यात आली.डॉ. विलास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्हीही आॅपरेशन्स यशस्वी झाली. आॅपरेशननंतर दोघींचीही तब्येत चांगली आहे. अगोदरच कोल्हापुरातील उपचारार्थ एक लाख रुपये खर्च झाले होते. त्यानंतर कृष्णा हॉस्पिटलमध्ये दोघींच्या आॅपरेशनसाठी तब्बल अडीच लाख रुपये खर्चआला. त्यातील राजीव गांधी जीवनदायी योजनेतून एक लाख ४० हजार रुपये मिळाले. उर्वरित
खर्च पाटील कुटुंबीयांना करावा लागला. दरम्यान, मालुतार्इंनी स्वत:चा जीव धोक्यात घालून दिलेल्या किडणीमुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
माझ्या पोटच्या गोळ्याची ही अवस्था झाल्याचं कळल्यावर धक्काच बसला. माझं काहीही होऊ दे, पण मुलगी जगली पाहिजे, हाच विचार करून मी तिला किडणी दिली. त्यामुळं मला माझ्या जीवनाचं सार्थक झाल्यासारखं वाटलं.
- मालुताई पाटील
सारखं आजारी पडत असल्यामुळे मी अगोदरच अस्वस्थ झाले होते. त्यातच दोन्हीही किडण्या निकामी झाल्याचे समजताच अवसानच गळून गेले; पण माझ्या आईने आधार दिलाच, शिवाय किडणीही देऊन माझा जीव वाचविला.
- संगीता पाटील