असा जपला त्यांनी मैत्रीचा अनमोल धागा
By admin | Published: August 3, 2015 12:33 AM2015-08-03T00:33:55+5:302015-08-03T00:39:45+5:30
\‘बालकल्याण’ला भेट : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची सामाजिक बांधीलकी
दीपक जाधव - कोल्हापूर -सर्व कॉलेज तरुण-तरुणी आॅगस्टच्या पहिल्या रविवारी एकमेकांना मैत्रीचा धागा अर्थात ‘फ्रेंडशिप डे’चा बँड बांधण्यात गुंतली होती. दुसरीकडे मात्र, काहीजणांनी बालकल्याण संकुल येथील मुलांबरोबर रविवारचा मैत्री दिवस साजरा केला. त्यामध्ये येथील मुलांना लागणाऱ्या वस्तू देऊन व त्यांच्याशी खरोखरची मैत्री करून हा धागा आणखी घट्ट केला.
‘फ्रेंडशिप डे’ अर्थात मैत्रीचा दिवस म्हणून आॅगस्ट महिन्यातील पहिला रविवार जगभरात साजरा करतात. त्यात कोल्हापुरातीलही तरुण-तरुणी कसे मागे राहतील. या दिवशी अनेकांनी नेहमीच्या कट्ट्यावर येत एकमेकांना मैत्रीचे धागे बांधले. त्यात मुलांनी, मुलींनीही हा धागा बांधला. यानिमित्त विविध हॉटेल्स, स्नॅक सेंटर फुल्ल होती. मात्र, डी. वाय. पाटील कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या स्नेहल जोशी, सायली जोशी, मृणाल जोशी, मानसी विभूते, मयूरी चव्हाण, वृषाली चव्हाण, नेत्रा लोहार, श्वेता पाटील, शिवानी जाधव, गणेश पाटील, अर्शद इनामदार, सागर घाडगे, मनोज पाटील, विशाल पवार, दीपक गुरव, दुर्वांकुर संकपाळ, अनिकेत झेंडे, विराज शेवाळे, इरफान अब्दुलरहिमान, आकाश रावण, सिद्धी जरग, शंतनू यादव यांच्याबरोबरच महाराष्ट्र हायस्कूल, होलिक्रॉस स्कूल, संकेश्वर येथील निडसोशी इंजिनिअरिंग कॉलेज, आदी संस्थांतील विद्यार्थ्यांनी बालसंकुलातील मुला-मुलींबरोबर गप्पा मारत दिवस साजरा केला. या विद्यार्थ्यांनी संस्थेसाठी लागणाऱ्या दैनंदिन वस्तू भेट स्वरूपात दिल्या. त्यात काही मुलींनी लहान मुलींबरोबर सेल्फी काढून आपला आनंद द्विगुणीत केला.
कोल्हापुरातील मंगळवार पेठ येथील बालकल्याण संकुलात रविवारी डॉ. डी. वाय. पाटील इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनींनी भेट देत संस्थेतील मुलींबरोबर सेल्फी काढत आपला आनंद आणखी द्विगुणीत केला.