"गोचिडासारखे जनतेचे रक्त शोषले, म्हणूनच जेलमध्ये बेसन-भाकरी खावी लागली"- मनोज जरांगे
By उद्धव गोडसे | Published: November 17, 2023 09:40 PM2023-11-17T21:40:56+5:302023-11-17T21:42:14+5:30
मनोज जरांगे-पाटलांचे मंत्री छगन भुजबळांना जोरदार प्रत्युत्तर, आरक्षणाच्या जन्मभूमीतून जरांगे कडाडले
उद्धव गोडसे
कोल्हापूर : जालना येथील ओबीसींच्या आरक्षण बचाव एल्गार सभेत बोलताना ओबीसींचे नेते मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे-पाटील यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या. त्यावर मनोज जरांगे-पाटील यांनी कोल्हापुरातील सभेतून जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यांच्याकडे एकवेळ जेवणासाठी पैसे नव्हते. त्यांनी गोचिडासारखे जनतेचे रक्त शोषले, त्यामुळेच त्यांना जेलमध्ये बेसन-भाकरी खावी लागली असा हल्ला जरांगे-पाटील यांनी केला.
मंत्री भुजबळ यांनी आरक्षण बचाव एल्गार सभेतून बोलताना मराठा आरक्षण आंदोलनासाठी राज्यभर दौरे करणारे मनोज जरांगे-पाटील यांना लक्ष्य केले. त्यांचे उपोषण आणि दौ-यांची थट्टा उडवताना पोलिस आणि ओबीसी नेत्यांच्या घरांवर झालेल्या हल्ल्यांबद्दल अप्रत्यक्षरित्या जरांगे-पाटील यांना जबाबदार धरले. कोल्हापुरातील सभेत बोलताना जरांगे-पाटील यांनी मंत्री भुजबळ यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, 'व्यक्ती म्हणून त्यांच्याबद्दल आदर होता. मात्र, एवढ्या मोठ्या माणसाने आज पातळी सोडली. आम्ही आमच्या कष्टाचे खातो. घाम गाळतो. एक दिवसाच्या जेवणासाठी पैसे नव्हते, अशी तुमची परिस्थिती होती. आज तुमच्याकडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती आली कोठून? तुम्ही गोचिडासारखे आमच्या जनतेचे रक्त शोषूण करोडोची संपत्ती कमवली. म्हणूनच तुम्हाला जेलमध्ये जाऊन बेसन-भाकरी खावी लागली. गोरगरिबांचा तळतळाट तुम्हाला स्वस्थ घरात बसू देत नव्हता. त्यामुळेच तुम्ही तुरुंगात गेला. जे सत्य आहे ते बोललेच पाहिजे.'
मीही त्यांना सोडणार नाही...
मंत्री भुजबळ यांच्यावर मी काही बोलत नव्हतो. काहीही गरज नसताना ते माझ्यावर बोलत आहेत. ते काहीतरी उतरून काढत असतील तर मीही त्यांना सोडणार नाही. भुजबळ यांना राज्यात जातीय तेढ निर्माण करायची आहे. सरकारने त्यांना बोलायचे बंद करावे. अन्यथा आमचाही नाईलाज होईल. बांध फोडला तर आमच्या दोन-दोन पिढ्या बोलत नाहीत. मग आमचं आरक्षण खाणा-यांना काय करू? त्यांना रोखा, अन्यथा आम्हाला जशास तसे उत्तर द्यावे लागेल. असा इशाराही जरांगे-पाटील यांनी दिला.
त्यांना मुख्यमंत्री व्हायचं आहे...
मंत्री भुजबळ यांना मुख्यमंत्री बनण्याचे डोहाळे लागल्याचा आरोप जरांगे-पाटील यांनी केला. त्यांना मुख्यमंत्री बनायचे आहे. तीच इच्छा त्यांच्या ओठावर आली. पण, ते खुप अवघड आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचे काय होणार? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.