‘गोकुळ’मध्ये सुडाचे राजकारण करणार नाही - सतेज पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:24 AM2021-05-08T04:24:23+5:302021-05-08T04:24:23+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ‘गोकुळ’ची सत्ता ही दूध उत्पादकांच्या भल्यासाठी आहे, येथे कोणत्याही प्रकारचे सुडाचे राजकारण करणार नसल्याची ...

Suda will not do politics in 'Gokul' - Satej Patil | ‘गोकुळ’मध्ये सुडाचे राजकारण करणार नाही - सतेज पाटील

‘गोकुळ’मध्ये सुडाचे राजकारण करणार नाही - सतेज पाटील

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : ‘गोकुळ’ची सत्ता ही दूध उत्पादकांच्या भल्यासाठी आहे, येथे कोणत्याही प्रकारचे सुडाचे राजकारण करणार नसल्याची ग्वाही पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली. टँकर काढणे किंवा दुसरे लावणे हे आमचे उद्दिष्ट नसल्याचे स्पष्टीकरणही त्यांनी दिले. दूध संघात गेली अनेक वर्षे सुरू असलेल्या चुकीच्या प्रथा मात्र बंद करणार, असे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या बैठकीत ते बोलत होते.

मंत्री पाटील म्हणाले, दूध उत्पादकांनी मोठ्या विश्वासाने आम्हाला सत्ता दिली. त्यांच्या भल्यासाठीच सगळे निर्णय घेतले जातील. निवडणुकीपुरते राजकारण, तेथून पुढे ‘गोकुळ’चे हित डोळ्यासमोर ठेवून काम केले जाईल.

मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, आमच्याकडे सत्ता आली म्हणून कर्मचाऱ्यांना काढून टाकणे आदी गोष्टी आम्ही करणार नाही. मात्र गेली अनेक वर्षे दूध संघात सुरू असलेल्या प्रथा व परंपरा यापुढे बंद केल्या जाणार, हे निश्चित आहे. आमदार विनय कोरे यांचा दुधात चांगला अभ्यास आहे, त्यांचे मार्गदर्शन घेऊन भविष्यातील नियोजन केले जाईल.

‘गोकुळ’चे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांनी स्वागत केले. अरुण डोंगळे यांनी मनोगत व्यक्त केले. के. पी. पाटील यांनी आभार मानले. आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार संजय मंडलिक, श्रीमती निवेदिता माने, आमदार विनय कोरे, प्रकाश आबिटकर, राजेश पाटील, राजू आवळे, जयंत आसगावकर, ऋतुराज पाटील, चंद्रदीप नरके, संध्यादेवी कुपेकर, ए. वाय. पाटील, महाबळेश्वर चौगले, विद्याधर गुरबे, वीरेंद्र मंडलिक आदी उपस्थित होते.

संजय मंडलिक यांचे मौन

‘गोकुळ’च्या निवडणुकीत खासदार संजय मंडलिक यांचे सुपुत्र वीरेंद्र व भगिनी सुश्मिता पाटील यांचा पराभव झाला. त्यानंतर वीरेंद्र यांनी व्यक्त केलेल्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर खासदार मंडलिक काय बोलणार, याकडे लक्ष होते. मात्र त्यांनी मौन पाळणे पसंत केले.

आमच्या पराभवासाठी भाजपने देव पाण्यात घातले

आपल्या व सतेज पाटील यांच्या पराभवासाठी भाजपच्या नेत्यांनी देव पाण्यात घातले होते. मात्र नियती आमच्यासोबत होती. सगळे फासे आमच्या बाजूने पडले. त्यामुळेच तीस वर्षांनंतर सत्तांतर करू शकल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

नवनिर्वाचित संचालक आज सौंदत्तीवर

आज, शनिवारी सकाळी अकरा वाजता नवनिर्वाचित संचालक ताराबाई पार्क येथे एकत्रित होणार असून, तेथून गोकुळ शिरगाव येथील प्रकल्पावर जाऊन संस्थापक आनंदराव पाटील-चुयेकर यांना अभिवादन करणार आहेत. त्यानंतर आप्पाचीवाडी येथे हलसिध्दनाथाचे दर्शन घेऊन थेट सौंदत्तीला जायचे असल्याची माहिती ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांनी दिली.

Web Title: Suda will not do politics in 'Gokul' - Satej Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.