भाजपकडून विकास निधीत सुडाचे राजकारण

By Admin | Published: September 9, 2015 12:25 AM2015-09-09T00:25:29+5:302015-09-09T00:25:29+5:30

महापालिका पदाधिकाऱ्यांचा आरोप : सभागृहाला अधांतरी ठेवून निर्णय

Suda's politics of development fund from BJP | भाजपकडून विकास निधीत सुडाचे राजकारण

भाजपकडून विकास निधीत सुडाचे राजकारण

googlenewsNext

कोल्हापूर : गेल्या पाच वर्षांत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व जनसुराज्य पक्षाची सत्ता असताना कोल्हापूर शहराच्या विकासासाठी ११३१ कोटी रुपयांचा निधी राज्य व केंद्र सरकारकडून आणला; पण त्याचे राजकारण कधी केले नाही; परंतु गेल्या आठ-दहा महिन्यांत भाजपने २० कोटींचा निधी आणला. मात्र, त्याद्वारे सुडाचे राजकारण केले जात आहे, असा आरोप महापौर वैशाली डकरे यांच्यासह महापालिकेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी केला. विकासकामांसाठी आणलेल्या २० कोटींच्या निधीला आमचा विरोध नाही, तर सभागृहाला अधांतरी ठेवून आणि विश्वासात न घेता ज्या पद्धतीने विकासकामांचे नियोजन केले जात आहे त्याला आमचा विरोध आहे, असे राजेश लाटकर यांनी सांगितले. महत्त्वाचे म्हणजे सन २००८ मध्ये जो शासननिर्णय झाला आहे, त्यालाही भाजपने हारताळ फासला आहे. जिल्हास्तरीय समितीने राज्य सरकारच्या विकास निधीचे नियोजन करायचे असते. त्यासाठी मनपाचे ‘नाहरकत प्रमाणपत्र’ असावे, अशी अट आहे; परंतु सर्व नियम बाजूला ठेऊन कुणीतरी तिसरेच नियोजन करत आहेत, असे लाटकर म्हणाले. केशवराव भोसले नाट्यगृहाचे सुशोभिकरण, शहरांतर्गत जलवाहिनी बदलणे, भुयारी गटार योजना, सुजल योजनेतून हाती घ्यायची कामे आदींसाठी निधी मिळावा म्हणून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना चार ते पाचवेळा निवेदने दिली; पण त्यांनी त्याची दखल घेतली नाही. परंतु निवडणुकीच्या तोंडावर २० कोटींचा निधी आणून काँग्रेस, राष्ट्रवादीला बदनाम करण्याचे, सुडाचे राजकारण ते करत आहेत, असे लाटकर म्हणाले.
भाजपने जे कामांचे नियोजन केले आहे ते चुकीचे आहे. खासगी जागेत रस्ते धरले आहेत. ज्या कामांना निधी जास्त लागणार आहे, त्यांना केवळ दोन ते तीन लाखांची तरतूद केली आहे. काही कामे आधी मंजूर आहेत त्यावर पुन्हा निधी खर्च केला जाणार आहे. त्यामुळेच आमचा या कामांना विरोध आहे, असे शारंगधर देशमुख म्हणाले.
यावेळी उपमहापौर ज्योत्स्ना मेढे-पवार, सभागृह नेता चंद्रकांत घाटगे, परिवहन सभापती अजित पोवार, शिक्षण मंडळ सभापती महेश जाधव, महिला व बालकल्याण सभापती लीला धुमाळ, श्रीकांत बनसोडे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

२० कोटींच्या निधीबाबत अस्वस्थता का : पालक मंत्री
कोल्हापूर : भाजप सरकारने शहरातील विकासकामांसाठी २० कोटींचा निधी दिला असला तरी त्याचे संपूर्ण नियोजन सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात येत आहे. त्यात काही त्रुटी असतील तर त्या नक्की दुरुस्त केल्या जातील, पण सूचना करण्याऐवजी आगपाखड का केली जाते आहे. निधीबाबत काँग्रेस व राष्ट्रवादीला एवढी अस्वस्थता का? असा सवाल पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला. सुडाचे राजकारण आम्ही नाही तर तेच करत असल्याचा प्रतिआरोपही त्यांनी केला. २० कोटींच्या निधीतून शहरातील विकासकामे केली जाणार आहेत. पालकमंत्री पाटील म्हणाले की, कामांची जागेवर जाऊन पाहणी करावी, असा आग्रह महापालिका प्रशासनाने धरला, त्यानुसार संयुक्त पाहणी झाली. आणखी काही गोष्टी निदर्शनास आल्या तर त्यानुसार बदल करण्यात येतील. पण कॉँग्रेस व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची एवढी अस्वस्थता का? अगदी दुर्बिण लावून तपासणी करून डोकं खाजवत बसण्यापेक्षा हेच डोकं त्यांनी दुसरीकडे वापरावे.

Web Title: Suda's politics of development fund from BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.