बीएडच्या सीईटी परिक्षेच्या केंद्रात अचानक बदल, कोल्हापूरच्या विद्यार्थ्यांना भुर्दंड
By संदीप आडनाईक | Published: April 23, 2023 10:04 PM2023-04-23T22:04:24+5:302023-04-23T22:05:16+5:30
उच्च आणि तंत्रशिक्षण मंडळाकडून राज्य शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी दोन वर्षाच्या बीएड अभ्यासक्रमासाठी (जनरल आणि स्पेशल ) ऑनलाईन महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा २३, २४ आणि २५ एप्रिल या कालावधीत होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : उच्च आणि तंत्रशिक्षण मंडळाकडून राज्य शिक्षण मंडळातर्फे सीईटी सेलमार्फत घेण्यात येणारी बीएड (जनरल आणि स्पेशल ) महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा रविवारी घेण्यात आली, मात्र या परीक्षेसाठी कोल्हापूरातील केआयटी अभियांत्रिकी (स्वायत्त) महाविद्यालयाने या परीक्षेचे केंद्र अचानक रद्द करुन ३५ किलोमीटर अंतरावरील वाठार येथील अशोकराव माने टेक्निकल इन्स्टिट्यूट येथील केंद्रात पाठविल्याने केआयटी केंद्रावरील शंभराहून अधिक विद्यार्थ्यांना नाहक मन:स्ताप आणि भुर्दंड सहन करावा लागला.
उच्च आणि तंत्रशिक्षण मंडळाकडून राज्य शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी दोन वर्षाच्या बीएड अभ्यासक्रमासाठी (जनरल आणि स्पेशल ) ऑनलाईन महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा २३, २४ आणि २५ एप्रिल या कालावधीत होत आहे. या परीक्षांसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी बसले आहेत. रविवारी होणाऱ्या या प्रवेश परीक्षेसाठी कोल्हापूरातील सुमारे शंभरावर विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था केआयटी अभियांत्रिकी (स्वायत्त) महाविद्यालयाच्या केंद्रावर होणार होती. सकाळी ९ ते १०.३० या वेळेत होणाऱ्या या परीक्षेचे ॲडमिट कार्डही विद्यार्थ्यांकडे तयार होते. रविवारी सकाळी ७.३० वाजता रिपोर्टिंग करण्याचे बंधन होते. त्यामुळे अनेक विद्यार्थी सकाळी ७ वाजल्यापासूनच या महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर पोहोचले. परंतु तेथील सुरक्षा रक्षकांनी विद्यार्थ्यांना आत प्रवेश करु दिला नाही.
या महाविद्यालयात एक मोठा कार्यक्रम होणार असल्याने हे परीक्षा केंद्र रद्द केल्याची माहिती सुरक्षा रक्षकांनीच तब्बल अर्ध्या तासांनी म्हणजे सकाळी ८ वाजता विद्यार्थ्यांना सांगितली आणि तेथून सुमारे ३५ किलोमीटर दूर अंतर असलेल्या वाठार येथील अशोकराव माने इन्स्टिट्यूट हे केंद्र दिल्याचे सुरक्षा रक्षकांनीच सांगितले. त्यानंतर या परिसरातील एकमेव नेट कॅफेमध्ये जाउन विद्यार्थ्यांनी वाठारच्या कॉलेजचे ॲडमिट कार्ड काढून घेउन वाठारला पोहोचले. ठीक ९ वाजता ही परीक्षा सुरु होणार असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना या जागेवर पोहोचण्यासाठी कसरत करावी लागली. यामुळे मोठा प्रवास आणि भुर्दंड याबरोबरच मानसिक तसेच शारिरिक त्रास सहन करावा लागला तो वेगळाच.
विद्यार्थ्यांना मेसेज परीक्षा झाल्यावर
या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी २४ मार्च रोजी अर्ज भरले होते, प्रत्यक्षात २२ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता परीपा केंद्राची लिंक असलेला मेसेज पाठविला गेला. दुसऱ्या केंद्रावरचे ॲडमिट कार्ड काढायलाही वेळ गेला. हा बदल झालेला मेसेजही ती परीक्षा झाल्यानंतर दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास मिळाला.