'मुश्रीफ यांचे खंदे कार्यकर्ते गणपतराव फराकटे यांचे आकस्मिक निधन
By विश्वास पाटील | Published: August 24, 2024 10:19 PM2024-08-24T22:19:06+5:302024-08-24T22:19:39+5:30
मंत्री मुश्रीफ यांच्या विधानसभा निवडणुकीत दोनवेळा त्यांनी दिलेल्या मताधिख्याचा मोठा वाटा होता..त्यामुळे मुश्रीफ यांचाही राजकीय आधार त्यांच्या निधनाने निखळला.
रमेश वारके
बोरवडे : कागल तालुक्यातील बिद्री सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष, बोरवडे गावचे माजी सरपंच आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे खंदे समर्थक गणपतराव गुंडू फराकटे ( वय ६५ ) यांचे शनिवारी रात्री ७ वाजता अल्पशा आजाराने आकस्मिक निधन झाले. त्यांच्यावर कोल्हापूरातील खासगी दवाखान्यात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने परिसरावर दुःखाची छाया पसरली आहे. अंत्यसंस्कार उद्या रविवारी सकाळी ८.३० वाजता बोरवडे येथे करण्यात येणार आहेत. मंत्री मुश्रीफ यांच्या विधानसभा निवडणुकीत दोनवेळा त्यांनी दिलेल्या मताधिख्याचा मोठा वाटा होता..त्यामुळे मुश्रीफ यांचाही राजकीय आधार त्यांच्या निधनाने निखळला.
जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मनोज फराकटे यांचे ते वडील तर कागल पंचायत समितीच्या माजी सदस्या, माजी सरपंच शोभाताई फराकटे यांचे ते पती होत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, एक विवाहित मुलगी, तीन भाऊ, भावजय, पुतणे असा मोठा परिवार आहे.
ज्येष्ठ बंधू व बोरवडेचे तत्कालीन सरपंच ज्ञानदेव गुंडू फराकटे यांच्या मार्गदर्शनातून त्यांनी १९८६ साली विठ्ठल सहकारी दूध संस्थेत संचालक म्हणून राजकीय कारकिर्दीस सुरुवात केली. १९९० साली ते संस्थेचे अध्यक्ष झाले. तर १९९७ साली बोरवडे मतदारसंघातून निवडून येत ते सलग पाच वर्षे कागल पंचायत समितीचे उपसभापती होते.
बिद्री साखर कारखान्याचे ते २००५ ते आजअखेर संचालक आहेत. २००५ ते २००६ या कालावधीत त्यांनी बिद्रीचे उपाध्यक्षपद सांभाळले. डिसेंबर २०२३ मध्ये झालेल्या बिद्री साखर कारखान्याच्या निवडणूकीत विजयी झाल्यावर त्यांना दुसऱ्यांदा उपाध्यक्षपदी संधी मिळाली. बोरवडेचे पहिले लोकनियुक्त सरपंच म्हणूनही २०१७ ला निवडून आले. पंचक्रोशीत त्यांचा राजकीय, सामाजिक क्षेत्रात दबदबा होता..लोकांच्या मदतीला धावून जाण्याची त्यांची वृत्ती होती..त्या बळावरच त्यांनी जनतेची नाळ कधी तुटू दिली नाही...