बॅकलॉग विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबत महाविद्यालयांना अचानक सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 10:25 AM2020-12-15T10:25:28+5:302020-12-15T10:27:56+5:30
Shivaji University, exam, Student, Education Sector, kolhapur पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या सत्र चार व पाचमधील बॅकलॉग (अनुशेष) विद्यार्थ्यांच्या परीक्षा आज, मंगळवारपासून महाविद्यालय पातळीवर आयोजित करण्याबाबतच्या सूचना शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने सोमवारी सायंकाळी अचानकपणे दिल्या. त्यामुळे अनेक प्राचार्य, प्राध्यापकांसमोर या परीक्षेची तयारी कशी करायची, विद्यार्थ्यांना माहिती कशी द्यावयाची, असा प्रश्न उभारला.
कोल्हापूर : पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या सत्र चार व पाचमधील बॅकलॉग (अनुशेष) विद्यार्थ्यांच्या परीक्षा आज, मंगळवारपासून महाविद्यालय पातळीवर आयोजित करण्याबाबतच्या सूचना शिवाजी विद्यापीठाच्यापरीक्षा व मूल्यमापन मंडळाने सोमवारी सायंकाळी अचानकपणे दिल्या. त्यामुळे अनेक प्राचार्य, प्राध्यापकांसमोर या परीक्षेची तयारी कशी करायची, विद्यार्थ्यांना माहिती कशी द्यावयाची, असा प्रश्न उभारला.
ऑक्टोबरमध्ये विद्यापीठाने घेतलेल्या परीक्षेला राज्य सामाईक प्रवेश परीक्षा, कोविड-१९ चा प्रादुर्भाव, गैरहजर अथवा तांत्रिक कारणांमुळे ज्या विद्यार्थ्यांना प्रविष्ट होता आले नाही. अशा विद्यार्थ्यांच्या पुनर्परीक्षा आयोजनाचा निर्णय विद्यापीठाने घेतला. अंतिम वर्षास प्रवेशित असलेल्या आणि बॅकलॉग असलेल्या सर्व अभ्यासक्रमांच्या पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या बॅकलॉगअंतर्गत लेखी पुनर्परीक्षा दि. १५ ते ३१ डिसेंबर या कालावधीमध्ये घेण्याचा निर्णय विद्यापीठाने दि. ७ डिसेंबरला घेतला. त्यानंतर या परीक्षा महाविद्यालय अथवा अधिविभागांच्या पातळीवर सुयोग्य ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने आयोजित कराव्यात.
विषम सत्राच्या परीक्षा घेण्याबाबत निश्चित केलेल्या धोरणांनुसार समन्वयक अथवा अग्रणी महाविद्यालय किंवा विद्यापीठातील अधिविभागांच्यास्तरावर या परीक्षा घेण्यात याव्यात, अशी सूचना परीक्षा मंडळाने दि. ९ डिसेंबरला परिपत्रकाव्दारे अधिविभागप्रमुख, महाविद्यालयांच्या प्राचार्यांना केली.
त्यानुसार महाविद्यालयांनी सत्र एक, तीन आणि पाच या विषम सत्रांतील बॅकलॉग विद्यार्थ्यांच्या परीक्षा या अग्रणीव्दारे घेण्याची तयारी सुरू केली. मात्र, त्यातच सत्र चारच्या लेखी पुनर्परीक्षा अग्रणी अथवा समन्वयक महाविद्यालयांऐवजी शैक्षणिक संस्था किंवा महाविद्यालयस्तरावर आयोजित करण्यात याव्यात, अशी सूचना परीक्षा मंडळाने सोमवारी केली
सत्र चार आणि पाचमधील बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांना यापूर्वी परीक्षा देण्याची संधी दिली होती. त्यातही काही कारणास्तव जे विद्यार्थी गैरहजर असतील. त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून विद्यापीठाने त्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी दिली आहे. त्यानुसार या विद्यार्थ्यांची परीक्षा ही महाविद्यालय अथवा शैक्षणिक संस्थांच्या स्तरावर आयोजित केली आहे.
- ग्गजानन पळसे,
प्रभारी संचालक, परीक्षा मंडळ