सुधा मूर्ती कोल्हापुरातील जुन्या घरी, उलगडली आठवणींची पानं; अंबाबाईचेही घेतले दर्शन!
By संदीप आडनाईक | Published: November 8, 2022 06:58 AM2022-11-08T06:58:37+5:302022-11-08T06:59:33+5:30
साध्या आणि दानशूर सुधा मूर्तींनी कोल्हापुरातील आपल्या ७० वर्षांपूर्वीच्या जुन्या वास्तव्याच्या जागा शोधून काढून सोमवारी आठवणींची पानं उलगडली.
कोल्हापूर :
त्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत, कुशल लेखिका आहेत. इन्फोसीस फाउंडेशनच्या अध्यक्षा म्हणून त्यांनी काम केले आहे. मराठी, कन्नड आणि इंग्रजी भाषेमधून त्यांनी केलेले लिखाण मोठ्या प्रमाणावर वाचले जाते. त्यांचे जावई ऋषी सुनक हे ब्रिटनचे पंतप्रधान झाल्यामुळे त्यांच्या भोवतीचे प्रसिद्धीचे वलय आणखी वाढले आहे. अशा अतिशय साध्या आणि दानशूर सुधा मूर्तींनी कोल्हापुरातील आपल्या ७० वर्षांपूर्वीच्या जुन्या वास्तव्याच्या जागा शोधून काढून सोमवारी आठवणींची पानं उलगडली. त्यांच्यासोबत त्यांंच्या मोठ्या भगिनीही होत्या.
सुधा मूर्ती आणि त्यांच्या भगिनी मंगला कुलकर्णी यांनी कोल्हापुरातील दोन दिवसांच्या मुक्कामात रंकाळा, अंबाबाईचे दर्शन तर घेतलेच, पण प्रकाशक अनिल मेहता यांच्या पुस्तकालयात आणि त्यांच्या घरातही पाहुणचार घेतला. मूर्ती यांना खरी ओढ होती, ती ७० वर्षांपूर्वी आपले बालपण जिथे गेले, ते घर पाहण्याची. वडिलांनी आयुष्यभराची पुंजी गुंतवून वास्तव्य केलेल्या घराला भेट दिल्यानंतर, त्यांना जणू तीर्थयात्राच घडल्यासारखं वाटलं.
अडीच वर्षांच्या असताना राहत होत्या त्या घरात डोकावून पाहताना त्या एकदम भारावून गेल्या. धाकट्या बहिणीचा जन्म ज्या घरात झाला, त्याच्या अंगणात काही वेळ त्या रेंगाळल्या.
कुरुंदवाड येथील घरीही दिली भेट
मोडकळीस आलेले वासे, तुळ्या आणि लोंबकळणारी जळमटं यातून वाट काढत सुधा मूर्ती यांनी कुरुंदवाड येथील आपल्या घराची पाहणी करीत आठवणींना उजाळा दिला. माझे घर, येथील जिव्हाळा कधीच विसरू शकत नाही, कोल्हापूरची कन्या असल्याचा सार्थ अभिमान आहे, अशी भावना सुधा मूर्ती यांनी व्यक्त केली. त्यांनी नृसिंहवाडीतील श्रीदत्त मंदिरात जाऊन दर्शन घेतले.