जाणिवा समृद्ध करणारे ‘प्रत्यय’

By admin | Published: March 13, 2016 11:35 PM2016-03-13T23:35:19+5:302016-03-14T00:03:38+5:30

नाट्यकलेतून प्रबोधन : तीन दशकांहून अधिक काळ प्रयोग; वेगळी वाट चोखाळण्याचा प्रयत्न -- लोकमतसंगे जाणून घेऊ

'Suffix' to enrich knowledge | जाणिवा समृद्ध करणारे ‘प्रत्यय’

जाणिवा समृद्ध करणारे ‘प्रत्यय’

Next

संतोष तोडकर- कोल्हापूर --नाटक ही एक गांभीर्याने सादर करण्याची कला असून, तिचे मनोरंजन मूल्यही तितकेच महत्त्वाचे आहे हे मानून ३५ वर्षांहून अधिक वर्षे नाट्यक्षेत्रात वेगळी वाट चोखाळणाऱ्या संस्थेमध्ये ‘प्रत्यय’ हौशी नाट्य कला केंद्र महत्त्वाचे म्हणून ओळखले जाते. जगभर पुरोगामी व प्रस्थापित कलाविष्काराला छेद देण्याकरिता १९८० च्या दशकात सुरू झालेल्या विविध कलात्मक प्रभावातून ऊर्मी घेऊन दिलीप कुलकर्णी, चंद्रकांत कल्लोळी, पवन खेबुडकर, किरण खेबुडकर, अनिल सडोलीकर, शेखर पडळकर, उदय नारकर, माया पंडित, शरद नावरे या तरुण मंडळींनी ‘प्रत्यय’ची स्थापना केली.
गेल्या ३५ वर्षांत ‘प्रत्यय’ने पूर्ण लांबीची एकूण २९ नाटके रंगभूमीवर सादर केली. चाकोरीबाहेरचा विषय निवडून त्याच्या अज्ञात पैलूंवर प्रकाशझोत टाकण्याचे काम करणाऱ्या नाटककार चंद्रकांत देशपांडेंचं ‘एक गगनभेदी किंकाळी’ हे नाटक सन १९८० मध्ये ‘प्रत्यय’ने रंगमंचावर आणत आपल्या नाट्यप्रवासाला सुरुवात केली. या नाटकाचे दिग्दर्शन प्रसन्न कुलकर्णी यांनी केले होते.
सन १९८१ मध्ये मूळ जर्मन लेखक ब्रर्टोल्ड ब्रेस्टच्या ‘एक्सेप्शन अ‍ॅँड द रूल’ या नाटकाचा दिलीप कुलकर्णी यांनी केलेला मराठी अनुवाद ‘नियम आणि अपवाद’ हे नाटक संस्थेने सादर केला.
करारी, तत्त्वनिष्ठ मार्किस्ट नेत्याच्या पराभूत थोरवीची गाथा सांगणारे गो. पु. देशपांडे लिखित ‘उद्ध्वस्त धर्मशाळा’ हे नाटक सन १९८२ मध्ये ‘प्रत्यय’च्या माध्यमातून रंगमंचावर आले. या नाटकातून
डॉ. शरद भुताडिया यांनी ‘प्रत्यय’साठी दिग्दर्शनाला सुरुवात केली. त्यानंतर एका राजकीय कैद्याचा अपघाती मृत्यू (सन १९८४), घोडा (सन १९८५), सवाई माधवराव यांचा मृत्यू (सन १९८६), राशोमन (सन १९८७), उत्तररामचरित (सन १९८८), दुशिंगराव आणि त्याचा माणूस (सन १९८९), वाटा-पाऊलवाटा (सन १९९०), राजा लियर, सत्यशोधक (सन १९९३), फुटबॉल (सन २००१), कर्फ्यू (सन २००३), ऊन-पाऊस (सन २००५), दिव्याखाली उजेड (सन २००६), आईन्स्टाईन (सन २००६), नाहीच तर कुठून देणार?(सन २०१२), शेवटचा दिस (सन २०१३) या नाटकांच्या दिग्दर्शनाची धुरा त्यांनी समर्थपणे सांभाळली.
या संस्थेतील आणखी एक महत्त्वाचे नाव म्हणजे दिग्दर्शक पवन खेबुडकर. स्त्रीजीवनातील अंधाऱ्या विश्वावर प्रकाश टाकणाऱ्या गो. पु. देशपांडेलिखित ‘अंधारयात्रा ’(सन १९९१) या नाटकाच्या माध्यमातून त्यांनी ‘प्रत्यय’मध्ये दिग्दर्शनाला सुरुवात केली. या नाटकाला राज्य नाट्य स्पर्धेतील प्राथमिक फेरीत तृतीय क्रमांक मिळाला. त्यानंतर त्यांनी सन १९९४ मध्ये ‘राशोमन’, तर सन १९९५ला ‘दुशिंगराव आणि त्याचा माणूस’ हे नाटक पुन्हा रंगमंचावर आणले. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या या नाटकाला राज्य नाट्य स्पर्धेत ‘उत्कृष्ट नाटका’चे दुसरे पारितोषिक मिळाले. त्यानंतर त्यांनी चॅलेंज (सन १९९६), ऐन वसंतात अर्ध्या रात्री (सन २०००), क्राईम अँड पनिशमेंट (सन २०१४), ‘कबीर’ या नाटकांचे दिग्दर्शन केले.
संस्थेतील दिग्दर्शक विजय केंकरे यांनी नागमंडल (सन १९९७) हे नाटक दिग्दर्शित केले. सन १९९८ अनिल सडोलीकर यांनी ‘उत्तररामचरित’ हे नाटक पुन्हा नव्याने रंगमंचावर आणले तसेच दिग्दर्शक किरण खेबुडकर यांनी शनिवार-रविवार (सन १९९९), तसेच कर्फ्यू (सन २००४) या नाटकांसाठी दिग्दर्शनाची धुरा पेलली. दिग्दर्शक सुकुमार पाटील यांनी सन २००२ ‘प्रत्यय’साठी ‘चरणदास चोर’ या नाटकाचे दिग्दर्शन केले.
दिग्दर्शक शरद भुताडिया यांनी दिग्दर्शित व अभिनय केलेल्या ‘किंग लियर’ या नाटकाचे कोलकाता, दिल्ली, नागपूर, बंगाली एज्युकेशन सोसायटी नागपूर, विदर्भ मराठी साहित्य परिषद, संगीत नाटक अकादमीचे केरळमधील ‘शेक्सपिअर महोत्सव’ या ठिकाणी प्रयोग झाले आहेत.
‘प्रत्यय’तर्फे सन १९८८ रंगमंचावर आणल्या गेलेल्या ‘उत्तररामचरित’ या नाटकाची नवी दिल्ली येथे झालेल्या संगीत नाटक अकादमी महोत्सवासाठी तसेच सन २००९ ‘आईन्स्टाईन’ या नाटकाची निवड नॅशनल स्कूल आॅफ ड्रामा (दिल्ली) येथील महोत्सवासाठी निवड झाली होती. ‘प्रत्यय’च्यावतीने एकांकिकाही विविध स्पर्धांमध्ये सादर केल्या आहेत. संस्थेला राज्य नाट्य स्पर्धेत ‘उत्कृष्ट नाटक’, ‘पटकथा’, ‘प्रक ाश योजना’, ‘रंगमंच सजावट’, ‘अभिनय’ यासारखे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.


प्रेक्षकांच्या अभिरुचीला शरण न जाता जीवनभाव समृद्ध करणारी दर्जेदार अव्यावसायिक नाटके हे ‘प्रत्यय’चे वैशिष्ट्य आहे. माणूस व समाजाच्या सांस्कृतिक प्रगल्भतेकरिता कसदार, आशयघन नाटकांचे सादरीकरण करणे, त्यावर प्रतिक्रिया, चर्चा घडवून आणणे असे उपक्रम ‘प्रत्यय’ने आजपर्यंत राबविले आहेत.
- डॉ. शरद भुताडिया ,
नाट्य दिग्दर्शक

‘किंग लियर’ नाटकाचा एप्रिलमध्ये विशेष प्रयोग
शेक्सपिअरच्या ४०० व्या स्मृतिदिनानिमित्त २३ एप्रिलला कोल्हापुरात ‘किंग लियर’ या नाटकाचा विशेष प्रयोग आम्ही करणार आहोत. सामाजिक जाणिवेपोटी पाश्चात्त्य व भारतीय रंगभूमीवरील क्लासिक, राजकीय विषयांवरील नाटकांचे प्रयोग यापुढेही संस्थेच्या वतीने रंगमंचावर आणली जातील.

Web Title: 'Suffix' to enrich knowledge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.