इच्छुकांची मनधरणी करताना नेत्यांची दमछाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:21 AM2021-01-04T04:21:31+5:302021-01-04T04:21:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जिल्ह्यातील ४३३ ग्रामपंचायतींच्या ४०२७ जागांसाठी मोठ्या संख्येने अर्ज दाखल झाले आहेत. आज, सोमवारी माघारीचा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : जिल्ह्यातील ४३३ ग्रामपंचायतींच्या ४०२७ जागांसाठी मोठ्या संख्येने अर्ज दाखल झाले आहेत. आज, सोमवारी माघारीचा अखेरचा दिवस असल्याने इच्छुकांची मनधरणी करताना स्थानिक नेत्यांची दमछाक उडत आहे. बंडखोरी टाळण्यासाठी ‘शब्द’ दिला जात आहे. दूध संस्था, विकास संस्थेत संधी देण्याचे आश्वासन देऊन समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे.
ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत स्थानिक राजकारण उफाळून येते. डाव, प्रतिडावातून एकमेकांचे कमकुवत दुवे शोधून त्यावर हल्ला करण्याची रणनिती आखली जाते. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून मतदानापर्यंत स्थानिक नेत्यांची डोकेदुखी वाढत जाते. जिल्ह्यातील ४३३ ग्रामपंचायतींमधील ४०२७ जागांसाठी १५ हजार ८३० अर्ज दाखल झाले होते. त्यातील १८७ अर्ज अवैध ठरल्याने आता १५ हजार ६४३ अर्ज शिल्लक राहिले आहेत. काही ठिकाणी बिनविरोधचे प्रयत्न झाले पण यश आले नाही. प्रभागात फार कमी मतदान असल्याने एखाद्याची बंडखोरी कोणाचा गुलाल हिरावून घेते तर कोणाच्या अंगावर अनपेक्षितपणे गुलाल पडतो. त्यामुळे बंडोबांना थंड करताना नेतृत्वाची दमछाक उडत आहे.
सोमवारी दुपारी तीन वाजेपर्यंत माघार घेता येणार असून त्यानंतर चिन्हे वाटप केले जाणार आहेत. दोन दिवस सुट्टी असल्याने सोमवारी माघारीसाठी झुंबड उडणार आहे. इच्छुकांना इतर संस्थेत घेण्याचा शब्द देऊन बंडखोरी टाळण्याचा प्रयत्न सुरू आहे. तर कोणाची माघार कोणाच्या पथ्यावर पडू शकते, याचे आडाखे बांधूनच डावपेच आखले जात असल्याने माघारीसाठी मनधरणी करताना नेत्यांची दमछाक उडत आहे. त्यामुळे आज, किती ग्रामपंचायती बिनविरोध होणार की लढाई होणार याचा फैसला होेणार आहे.
दृष्टीक्षेपात ग्रामपंचायत निवडणूक
ग्रामपंचायती - ४३३
जागा - ४०२७
दाखल अर्ज - १५८३०
अवैध - १८७
वैध अर्ज - १५६४३