साखरेच्या बफर स्टॉकमध्ये ‘सह्याद्री’ देशात अव्वल: हुपरीचा ‘जवाहर’ दुसरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 12:28 AM2018-06-29T00:28:49+5:302018-06-29T00:29:06+5:30
चंद्रकांत कित्तुरे ।
कोल्हापूर : देशातील ५०२ साखर कारखान्यांचा साखरेचा बफर स्टॉक केंद्र सरकारने जाहीर केला आहे. यामध्ये देशात सातारा जिल्ह्यातील सह्याद्री साखर कारखाना पहिला, तर कोल्हापूर जिल्ह्यातील जवाहर साखर कारखाना दुसऱ्या स्थानावर आहे.
देशात यंदा साखरेचे ३१५ लाख टनांहून अधिक उत्पादन झाले आहे, तर मागणी २५० लाख टन आहे. अतिरिक्त उत्पादन झाल्याने घाऊक बाजारातील साखरेचे दर २४ रुपयांपर्यंत खाली आले होते. ते वाढावेत यासाठी केंद्र सरकारने कारखान्यांसाठी साखरेचा विक्री दर ठरविण्यासह विविध उपाययोजना केल्या आहेत. यामध्ये ३० लाख टन साखरेचा बफर स्टॉक करण्याच्या निर्णयाचाही समावेश होता.
या निर्णयाची अंमलबजावणी करताना देशातील ५०२ साखर कारखान्यांकडील ३१ मे अखेर शिल्लक असलेला साखर साठा विचारात घेऊन प्रत्येक कारखान्याकडे किती साखरेचा बफर स्टॉक राहील याची कारखानानिहाय यादी केंद्र सरकारने जाहीर केली आहे. त्यामध्ये देशातील ३० कारखान्यांकडे १५ हजार टनांहून अधिक बफर स्टॉक राहणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांच्या वाट्याला एक लाख ९३ हजार टन साखर बफर स्टॉकसाठी आली आहे.
यात हुपरी येथील जवाहर सहकारी साखर कारखान्याकडे देशातील दुसºया क्रमांकाचा म्हणजेच ३१ हजार ३६५ टन बफर स्टॉक राहणार आहे. देशातील सर्वाधिक म्हणजे ३२ हजार ६८९ टन बफर स्टॉक सातारा जिल्ह्यातील कºहाड तालुक्यातील सह्याद्री साखर कारखान्याकडे असणार आहे. उत्तर प्रदेशातील खाटौली येथील त्रिवेणी कारखान्याकडे २३ हजार ८५५ टन, तर बेळगाव जिल्ह्यातील उगार साखर कारखान्याकडे २३ हजार ५६० टन साखरेचा बफर स्टॉक राहणार आहे.
साखरेचे दर वधारणार
केंद्र सरकारने ६००० कोटींचे पॅकेज जाहीर केल्यानंतर घाऊक बाजारातील साखरेचे दर ३२०० रुपये प्रतिक्विंटलवर गेले होते. सध्या ते २९५० ते ३००० रुपयांवर आहेत. साखरेच्या बफर स्टॉकमुळे हे दर वधारतील, असा साखर उद्योगातील तज्ज्ञांचा अंदाज आहे.
राज्यात जादा साखर साठा
गेल्या दोन-तीन वर्षापासून उत्तर प्रदेश साखर उत्पादनात प्रथम क्रमांकावर आहे. मात्र बफर स्टॉकची यादी पहाता तेथील कारखान्यांपेक्षा महाराष्टÑातील कारखान्याकडे जादा साखर शिल्लक असल्याचे दिसते. यावरुन उत्तर प्रदेशातील कारखान्यांनी त्यांच्याकडील साखर मोठ्या प्रमाणात विकून टाकल्याचे स्पष्ट होते.
व्याज, विमा, गोदाम भाडे मिळणार
बफर स्टॉक करणाºया साखर कारखान्यांना केंद्र सरकार व्याज, विमा आणि गोदाम भाडे देणार आहे. त्यासाठी ११०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. हा स्टॉक एक वर्षासाठी असणार आहे.
साखर विक्रीचे दर ठरवून दिल्याने आणि बफर स्टॉक केल्याने बाजारातील साखरेचे दर वाढतील आणि कारखान्यांना त्यांची देणी देणे शक्य होईल. सह्याद्री कारखान्याने एफआरपी पेक्षा १०० रुपये जास्त दर दिला आहे. त्याची बिलेही अदा केली आहेत.
- आमदार बाळासाहेब पाटील, अध्यक्ष, सह्याद्री सहकारी साखर कारखाना.