साखरपुडा झाला; लग्नापूर्वीच प्लॉट, दुकानगाळ्यासाठी मुलगा अडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2020 12:38 PM2020-03-13T12:38:51+5:302020-03-13T12:40:15+5:30
कोल्हापूर : मोठ्या डामडौलामध्ये मुलीचा साखरपुडा करून दिला अन् लग्नाची तारीख निश्चित करताना नवरा मुलाच्या नावे प्रथम लग्नापूर्वी एक ...
कोल्हापूर : मोठ्या डामडौलामध्ये मुलीचा साखरपुडा करून दिला अन् लग्नाची तारीख निश्चित करताना नवरा मुलाच्या नावे प्रथम लग्नापूर्वी एक गुंठा जमीन व औषधविक्री व्यवसायासाठी दुकानगाळा खरेदी करून द्या, असा तगादा मुुलीच्या वडिलांकडे लावल्याचा प्रकार घडला. हतबल झालेल्या मुलीच्या वडिलांनी पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणी केर्ली (ता. करवीर) येथील नियोजित वर निखिल संभाजी मोहिते, त्याचे वडील संभाजी रामचंद्र मोहिते यांच्यासह एकूण सातजणांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, उच्चशिक्षित मुलीचे लग्न केर्ली येथील नियोजित वर निखिल मोहिते याच्याशी ठरले होते. ठरल्याप्रमाणे मुुलीच्या वडिलांनी नोव्हेंबरमध्ये हॉलमध्ये योग्य मानपानात थाटामाटात साखरपुडा केला. साखरपुड्यानंतर सुमारे चार महिन्यांनी मार्चमध्ये लग्नाची तारीख निश्चित केली; पण साखरपुड्यानंतर सुमारे तीन महिन्यांनी मुलाच्या वडिलांनी अॅँजिओग्राफीसााठी मुुलीच्या घरच्यांकडून ५० हजार रुपये घेतले. पुढे लग्नसमारंभासाठी मुलीच्या वडिलांनी कार्यालयही बुक केले; पण त्यानंतर मुलाकडील नातेवाइकांनी लग्नासाठी टोलवाटोलवी केली. मुलीच्या चारित्र्यावर नाहक संशय व्यक्त केला. लग्नापूर्वीच एक गुंठा प्लॉट व औषधविक्री व्यवसायासाठी मुलाच्या नावे दुकानगाळा खरेदी करून द्या, अन्यथा लग्न मोडले जाईल, अशी धमकी दिली.
हतबल झालेल्या मुलीच्या वडिलांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर ती तक्रार एमआयडीसी शिरोली पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आली. तक्रारीनुसार मुलासह सातजणांवर गुन्हा नोंदविला आहे.
गुन्हा नोंद झालेल्यांची नावे
मुलगा निखिल मोहिते, त्याचे वडील संभाजी रामचंद्र मोहिते, आई आशा मोहिते, भाऊ सर्जेराव मोहिते यांच्यासह नामदेव रंगराव पाटील (सर्व रा. केर्ली, ता. करवीर), स्वाती रामचंद्र तळेकर, बाजीराव रामचंद्र तळेकर (दोघेही रा. सावरवाडी, ता. करवीर) यांच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
स्वत:च पत्र लिहून मुलीची बदनामी
मुलीची आमच्याकडे कोणीतरी प्रेमपत्रे पाठविली असल्याचे मुलाकडील लोकांनी सांगून मुलीची बदनामी केली. विशेष म्हणजे साखरपुड्यावेळी यादी करताना मुलाच्या दाजीचे हस्ताक्षर आणि मुलीच्या नावे दाखविलेल्या प्रेमपत्रातील मजकुराचे अक्षर एकसारखे असल्याचे दिसून आल्याचे मुलीच्या वडिलांनी तक्रारीत म्हटले आहे.