सांगलीत ३ मे रोजी प्रति साखर परिषद
By Admin | Published: April 26, 2015 11:21 PM2015-04-26T23:21:18+5:302015-04-27T00:17:17+5:30
सदाभाऊ खोत : सरकारविरोधी ‘स्वाभिमानी’चा एल्गार
सांगली : शेतकरी हिताची आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या सरकारकडून अपेक्षाभंग झाला आहे. तुम्ही शेतकऱ्यांवर गाढवाचा नांगर फिरवणार असाल, तर जनता तुम्हाला गाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, हे सत्ताधाऱ्यांनी लक्षात ठेवावे. सहा महिन्यांतील सरकारचा कारभार लक्षात घेता सरकारविरोधात मैदानात उतरणार असल्याचा इशारा संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी रविवारी पत्रकार बैठकीत दिला. लढ्याचाच एक भाग म्हणून ३ मे रोजी सांगलीत प्रति साखर
परिषदेचे आयोजन केल्याचेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले, कॉँग्रेस, राष्ट्रवादीच्या भ्रष्ट कारभाराला विरोध म्हणून शेतकरी संघटना भाजप सरकारच्या बाजूने उभी राहिली होती. सरकारने शेतकरी हिताचे निर्णय घ्यावेत, यासाठी त्यांना सूचना करूनही त्यांच्यात सुधारणा झालेली दिसत नाही. एफआरपीचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या हातात पडेल, अशी साधी अपेक्षा होती; परंतु सहकारमंत्र्यांच्या वल्गना सोडल्यास दमडीही शेतकऱ्यांना मिळालेली नाही. सरकारने केवळ लिकर लॉबीचे हित जपण्याचेच कार्य केले आहे.
मध्यंतरी पुणे येथे भाजप आणि राष्ट्रवादीने साखर परिषदेचे आयोजन केले होते. ज्यांनी शेतकऱ्यांच्या घरावर दरोडे घातले, त्यांना घेऊनच साखर परिषद घेण्यात आली. सरकारला सामान्य शेतकऱ्यांनी निवडून दिले होते, मग त्यांना बाजूला सारून कारखानदारांना परिषदेत का बोलाविले हे समजत नाही. अडतबाबत नेमलेली समितीही वाऱ्यावरची वरातच ठरणार असून, त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही. दूध दराबाबतही फारसे आशादायक चित्र नाही. या सर्व प्रश्नांवर आवाज उठविण्यासाठीच तीन मे रोजी सांगलीत राजपूत कार्यालयात दुपारी एक वाजता प्रति साखर परिषदेचे आयोजन केले आहे. (प्रतिनिधी)
पुुण्यात झालेल्या साखर परिषदेत सहकारमंत्री पाटील यांनी खासदार शरद पवार यांना गुरूची उपमा दिली आहे. हे त्यांनी निवडणुकीपूर्वी जनतेला सांगितले असते, तर मतदारांनी मत देताना नक्कीच विचार केला असता, असे खोत यांनी सांगितले.
पवारांचे ‘रनर’ व्हावे
शरद पवार अप्रत्यक्षरीत्या सरकारमध्येच असल्याने भाजप सरकारने त्यांनाच कृषिमंत्री करून सहकारमंत्री पाटील यांनी क्रिकेटमध्ये रनर असतो, तसे पवारांचे ‘रनर’ म्हणून काम करावे, असा टोलाही खोत यांनी लगावला.