साखर कारखान्यांनी उचलला विजेचा ‘भार’
By admin | Published: April 25, 2016 12:34 AM2016-04-25T00:34:24+5:302016-04-25T00:53:43+5:30
सहवीज प्रकल्प : स्वत:ची गरज भागवून कारखान्यांना हंगामात ४२० कोटी रुपयांचा वीज बोनस
प्रकाश पाटील --कोपार्डे --कोल्हापूर जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांनी २०१५/१६ या हंगामात ७२ कोटी ८५ लाख युनिट वीज निर्मिती केली असून, स्वत:ची विजेची गरज भागवून महावितरणला ६५ कोटी ५८ लाख युनिट विजेची विक्री केली आहे. सहवीज प्रकल्पातून विक्री होणाऱ्या विजेला प्रति युनिट सहा रुपये ४५ पैशांच्यावरती दर मिळतो. यातून या हंगामात ४१९ कोटी ७१ लाख ३९ हजार रुपयांचा बोनस जिल्ह्यातील कारखान्यांना मिळाला आहे. सहवीज प्रकल्पातून वीज निर्मिती व विक्रीत ‘दत्त शिरोळ’ने आघाडी घेतली असून, ‘वारणा’ दोन नंबरवर आहे.
केंद्र शासनाने विजेचा तुटवडा कमी करण्याबरोबर कोळसा वीज निर्मितीतील प्रदूषण टाळण्यासाठी साखर उद्योगातील ऊस गाळपातून उपलब्ध होणाऱ्या बगॅसपासून वीजनिर्मितीला प्राधान्य दिले. यासाठी सहवीज प्रकल्प राबविणाऱ्या साखर कारखान्यांचा ऊस खरेदीकर माफ करण्याबरोबर निर्माण होणारी वीज सहा रुपये ४५ पैसे प्रतियुनिट खरेदी करण्याची हमीही घेतली.
यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील २१ कारखान्यांपैकी १४ साखर कारखान्यांनी सहवीज प्रकल्प राबविण्याचा धाडसी निर्णय घेतला. गेली चार वर्षे साखर कारखान्यातील सहवीज प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या विजेचा आधार महावितरणलाही झाला असून, यामुळे भारनियमनावर पर्याय मिळाला आहे. मागील हंगामापेक्षा या हंगामात २०१५/१६ मध्ये जिल्ह्यातील १४ कारखान्यांच्या सहवीज प्रकल्पातून दहा कोटी युनिट जादा वीज निर्मिती झाली आहे.
ज्या साखर कारखान्यांचे वीज प्रकल्प आहेत, त्यांना ऊस खरेदीकर माफ असल्याने पाच लाख टन उसाचे गाळप कारणाऱ्या कारखान्यांना पाच कोटी, तर दहा लाख टन गाळप करणाऱ्यांना दहा कोटी ऊस खरेदीकर माफ होणार आहे.