साखर कारखान्यांना साठा मर्यादा लाग जूनमध्ये बाजारात उपलब्ध होणार २१ लाख टन साखरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2018 01:39 AM2018-06-08T01:39:42+5:302018-06-08T01:39:42+5:30
साखर उद्योगाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सात हजार कोटींचे पॅकेज जाहीर केल्यानंतर देशातील साखर कारखान्यांसाठी साठा मर्यादा लागू करतानाच आणि प्रत्येक साखर कारखान्याने या महिन्यात
चंद्रकांत कित्तुरे ।
कोल्हापूर : साखर उद्योगाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सात हजार कोटींचे पॅकेज जाहीर केल्यानंतर देशातील साखर कारखान्यांसाठी साठा मर्यादा लागू करतानाच आणि प्रत्येक साखर कारखान्याने या महिन्यात किती साखरेची विक्री करायची याचेही प्रमाण ठरवून दिले. त्यानुसार या महिन्यात देशांतर्गत बाजारात विक्रीसाठी २१ लाख टन साखर उपलब्ध होणार आहे.
अतिरिक्त साखरेचे उत्पादन आणि घसरलेले दर यामुळे देशातील साखर उद्योग अडचणीत आला आहे. ऊस बिलाची २२ हजार कोटींची थकबाकी कारखान्यांकडे आहे, ती देता यावी यासाठी प्रतिटन ५५ रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय केंद्र सरकारने याआधी जाहीर केला होता. बुधवारी (दि.६) इथेनॉल उत्पादनासाठी ४ हजार ४०० कोटी रुपये, ३० लाख टनाचा बफर स्टॉक करणे, साखरेचा किमान दर २९ रुपये प्रतिकिलो निश्चित करणे, असे निर्णय घेतानाच सात हजार कोटींचे पॅकेज या उद्योगासाठी जाहीर केले होते.
त्याच्या दुसºया दिवशी या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. साठा मर्यादा आणि साखर विक्री २९ रुपये प्रतिकिलो किमान दर यासंदर्भातल्या अधिसूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर प्रत्येक कारखान्याच्या या महिन्यातील साखर विक्रीचा कोटाही ठरवून देण्यात आला आहे.
यानुसार या महिन्यात २१ लाख मेट्रिक टन साखर खुल्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. कोटा ठरवून दिलेल्या देशातील ५२८ साखर कारखान्यांमध्ये महाराष्ट्रातील १८६ साखर कारखान्यांचा यामध्ये समावेश आहे.
साखर उद्योग सरकारी नियंत्रणाखाली
देशातील साखर उद्योग २०१३ मध्ये केंद्र सरकारने अंशत: नियंत्रणमुक्त केला होता. त्यानुसार कारखान्यांना बाजारात कितीही साखर विक्री करण्याची मुभा होती. मात्र, बुधवारच्या केंद्राच्या निर्णयानुसार तो पुन्हा सरकारी नियंत्रणाखाली आला आहे. किमान ठरवून दिलेल्या दरापेक्षा जादा दराने साखर विक्री करण्याची कारखान्यांना मुभा असली तरी ठरवून दिलेल्या कोट्यापेक्षा जादा साखर त्यांना विकता येणार नाही.