साखर उद्योगाला ‘अच्छे दिन’!
By admin | Published: March 26, 2016 12:48 AM2016-03-26T00:48:42+5:302016-03-26T00:49:24+5:30
दर प्रतिक्ंिवटल ३४०० रुपये : ‘एफआरपी’ देणे शक्य होणार
चंद्रकांत कित्तुरे --कोल्हापूर -साखरेचे दर प्रतिक्विंटल ३४०० रुपयांपर्यंत गेल्याने साखर उद्योगाला ‘अच्छे दिन ’ येण्याची चिन्हे दिसत आहेत. शुक्रवारी एका दिवसात साखरेच्या दरात प्रतिक्विंटल ५० ते ६० रुपयांची वाढ होऊन तो ३३५० ते ३४०० रुपये ( एक्स फॅक्टरी दर ३१५० ते ३२०० रुपये) झाला आहे. यामुळे कारखान्यांना उसाची एफआरपी देणे शक्य होणार आहे. बाजाराची कमान अशीच चढती राहिल्यास साखर कारखान्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासही मदत होणार आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारातील वाढलेले दर, त्यामुळे होत असलेली साखरेची निर्यात, दुष्काळामुळे गतवर्षीच्या तुलनेत घटलेले साखर उत्पादन आणि लग्नसराई आणि उन्हाळ्यामुळे वाढलेली साखरेची मागणी यामुळे बाजारातील साखरेचे दर वाढत आहेत. तसे दरवर्षीच मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यांत साखरेच्या दरात तेजी येत असते. यंदा थोडे उशिराच दर वाढू लागले आहेत. व्यापाऱ्यांकडील साखरेचा शिल्लक साठा आणि बाजाराचा कल पाहण्याची व्यापाऱ्यांची भूमिका यामुळे ही दरवाढ थोडी उशिरा सुरू झाल्याचे साखर कारखानदारीतील तज्ज्ञांचे मत
आहे.
या दरवाढीमुळे साखर कारखान्यांना चांगला दर मिळत असला तरी त्यामुळे लगेच त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल किंवा उसाला आणखी चांगला दर देणे शक्य होईल, असे नाही. कारण गेली दोन वर्षे बाजारात उत्पादन खर्चाइतकाही साखरेला दर नसतानाही तोटा सहन करून उसाला एफआरपीप्रमाणे कारखान्यांनी दर दिला आहे. यासाठी केंद्र सरकारकडून बिनव्याजी कर्ज घेतले आहे. त्याचा प्रतिटन बोजा साधारणपणे ६०० रुपये इतका आहे. हे कर्ज पाच वर्षांत फेडायचे आहे. यातले पहिले वर्ष गेले असे म्हटले तरी पुढील चार वर्षांत हे कर्ज फेडण्यासाठी प्रतिटन १२५ ते १५० रुपये कारखान्यांना बाजूला काढून ठेवावे लागणार आहेत.
वायदे बाजारातही साखरेच्या दरात शुक्रवारी ७५ रुपयांची वाढ झाली. एप्रिल महिन्यासाठी गुरुवारी एस ३० ग्रेडच्या साखरेचा दर कर वगळता प्रतिक्विंटल ३०७५ ते ३१२५ रुपये असा होता. तो एप्रिलच्या पहिल्या आठवड्यासाठी शुक्रवारी ३१३० ते ३१८० रुपये (यात २०० रुपये कराचे जमा केल्यास हा दर ३३३० ते ३३८० रुपये होतो) प्रतिक्विंटल इतका झाला आहे. गेल्या वर्षी देशांतर्गत साखरेचे उत्पादन २८ लाख टनांपर्यंत गेले होते. यंदा ते २५५ ते २६०
लाख टनांपर्यंत राहील, असा अंदाज आहे. दुष्काळामुळे पुढील वर्षी उसाचे क्षेत्र कमी होणार असल्याने साखर उत्पादनात आणखी घट होण्याची शक्यता आहे. यामुळे साखरेच्या दरात वाढ होऊ
लागली असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
अतिरिक्त साखर उत्पादनामुळे गेल्या दोन वर्षांत बाजारात मागणीपेक्षा साखरेचा पुरवठा जादा होता; मात्र सध्या साखरेची होणारी निर्यात आणि घटलेल्या उत्पादनामुळे मागणी पुरवठ्याचे संतुलन साधले गेल्याने बाजारातील साखरेचे दर वाढत आहेत. यामुळे कारखान्यांना एफआरपीप्रमाणे उसाची बिले भागविता येणे शक्य होणार आहे; मात्र गेल्या दोन वर्षांत एफआरपीसाठी घेतलेले बिनव्याजी कर्ज फेडण्याची जबाबदारीही कारखान्यांना पेलावी लागणार आहे
.- विजय औताडे, कार्यकारी संचालक,
छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना, कागल.