‘शुगरमिल’ कॉर्नर धोकादायक
By admin | Published: February 1, 2015 09:38 PM2015-02-01T21:38:16+5:302015-02-02T00:05:46+5:30
दोन महिन्यांत दीड डझन अपघात : स्पीडबे्रकर न झाल्यास तीव्र आंदोलन
रमेश पाटील -कसबा बावडा -शुगरमिल कॉर्नर परिसरात विकसित झालेल्या कॉलन्या... बावडा-एमआयडीसी या शंभर फुटी रस्त्यामुळे वाहनांचा वाढलेला प्रचंड वेग... ‘राजाराम’ कारखान्याची रस्त्याच्या दोन्ही बाजूस उभी असलेली उसाची वाहने, औद्योगिक वसाहत व राष्ट्रीय महामार्गावर जाणाऱ्या वाहनांची वाढलेली संख्या आणि शुगरमिल कॉर्नर चौकात वाहनांचे स्पीड नियंत्रणासाठी रस्त्याच्या दोन्हीही बाजूला नसलेले ‘स्पीडब्रेकर’ यामुळे या चौकातील अपघात आता नित्याचेच होऊन गेले आहेत. गेल्या दोन महिन्यांत किमान एक डझनाहून अधिक लहान-मोठे अपघात या चौकात झाले आहेत.
या चौकातील अपघाताचे वैशिष्ट्ये म्हणजे शिये-एमआयडीसीतून येत असलेली वाहनेच रस्ता क्रॉस करणाऱ्या वाहनांना पाठीमागून धडक देतात.शुगरमिल परिसरातील कॉलन्यांमधील वाहने जेव्हा रस्ता क्रॉस करून कोल्हापूरच्या दिशेला जाण्याचा प्रयत्न करतात तेव्हा वाहनचालकांचे स्पीड नियंत्रित असते; परंतु शंभर फुटी रस्त्यावरून येणाऱ्या वाहनांचे स्पीड खूपच जास्त असते. जेव्हा एखादे वाहन या चौकात रस्ता क्रॉस करीत असताना दिसून सुद्धा प्रचंड वेग असलेले वाहन नियंत्रण होऊ शकत नाही आणि अपघात होतात.
आता तर ‘राजाराम’ साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू आहे. त्यामुळे उसाने भरलेल्या बैलगाड्या याच रस्त्याने जातात; परंतु वाहनधारक आपली वाहने थांबविण्याऐवजी बैलगाडीवाल्यांनाच थांबविण्याचा प्रयत्न करून पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे अपघात होतात.
चौकापासून वाहने दूर लावणार
या चौकातील अपघात आता नित्याचेच झाले आहेत. या अपघाताला कुठेतरी आळा बसावा म्हणून राजाराम साखर कारखाना आपली उसाची वाहने या चौकापासून काही अंतर ठेवून े उभी करेल. तसेच या चौकातील रस्त्याच्या दोन्ही बाजूला स्पीडबे्रकर करावेत म्हणून महापालिकेला पत्र पाठविणार आहे.
- आर. सी. पाटील, कार्यकारी संचालक, राजाराम साखर कारखाना
स्पीडब्रेकरसाठी आयुक्तांना पत्र
शुगरमिल कॉर्नर चौकात स्पीडब्रेकर करावेत या मागणीचे निवेदन तत्कालीन आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांना दिले होते. त्यांनी वाहतूक शाखेशी याबाबत चर्चा करून स्पीडब्रेकर केले जातील, असे आश्वासन दिले होते; परंतु अद्याप स्पीडब्रेकर झालेले नाही. स्पीडब्रेकर व्हावे यासाठी आपला सतत पाठपुरावा सुरू आहे.
- प्रदीप उलपे, नगरसेवक (प्रभाग क्र. १)
आंदोलन करणार
या चौकात सतत अपघात होत असतात. बहुतेक सर्व अपघात हे वाहनांच्या प्रचंड वेगामुळे होतात. या परिसरातील नागरिकांना चालत रस्ता क्रॉस करून पलीकडे जाता येत नाही. तसेच अपघात झाल्यावर अन्य वाहनांची गर्दी या ठिकाणी खूप होते. त्यामुळे आणखी अपघात होण्याची भीती असते. त्यामुळे येत्या काही दिवसांत याठिकाणी स्पीडबे्रकर न झाल्यास तीव्र आंदोलन केले जाईल. - नाझीम मुल्ला, रहिवासी, राजाराम कॉलनी, शुगरमिल
स्पीड नियंत्रित फलक लावा
शुगरमिल चौकात स्पिड बे्रकर करून स्पीड मर्यादा किती असावी याचे फलक लावावेत. म्हणजे वाहनांचे स्पीड मर्यादित राहील.
- जयसिंग ठाणेकर, कसबा बावडा