रेल्वेची महसूलवाढीसाठी साखरपेरणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 12:50 AM2019-09-17T00:50:16+5:302019-09-17T00:50:21+5:30
चंद्रकांत कित्तुरे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : साखरेच्या देशांतर्गत वाहतुकीवर असणारा पाच टक्के अधिभार रेल्वेने रद्द केला आहे. ...
चंद्रकांत कित्तुरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : साखरेच्या देशांतर्गत वाहतुकीवर असणारा पाच टक्के अधिभार रेल्वेने रद्द केला आहे. तसेच जुलै, आॅगस्ट, सप्टेंबर या तीन महिन्यांसाठी असलेली वाहतूक भाड्यातील १५ टक्के सवलत एक आॅक्टोबरनंतरही चालू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फायदा व्यापारी आणि साखर कारखान्यांना होणार आहे.
देशांतर्गत बाजारपेठेत दर महिन्याला सुमारे २० लाख टन साखरेची विक्री होते. कारखाना कार्यस्थळापासून ही साखर देशभर पोहोचविण्यासाठी रेल्वे एक प्रमुख साधन आहे. अलीकडच्या काळात साखर वाहतुकीला ट्रक्स आणि इतर साधनेही उपलब्ध झाल्याने रेल्वेद्वारे होणारी वाहतूक आणि त्यातून मिळणारा महसूल कमी होऊ लागला आहे. पावसाळ्यातील जुलै, आॅगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांत मालवाहतूक कमी असते. त्यामुळे हा काळ मालवाहतुकीचा कृशकाळ समजला जातो. मालवाहतुकीच्या भाड्याद्वारे महसूल वाढावा, यासाठी रेल्वे दरवर्षी साखरेच्या वाहतुकीवर १५ टक्के सवलत देते. ही सवलत यंदा एक आॅक्टोबरनंतर म्हणजेच साखरेच्या नव्या हंगामातही सुरू राहणार आहे. त्याचबरोबर रेल्वे मिनी रेक आणि टू पॉईंट साखरेच्या वाहतुकीसाठी आकारला जाणारा पाच टक्के अधिभारही रेल्वेने रद्द केला आहे.
रेक, मिनी रेक आणि टू पॉईंट
एक रेक म्हणजे रेल्वेच्या ४२ वाघिणी किंवा डबे. त्यातून २६ हजार टन साखरेची वाहतूक होते. मिनी रेक म्हणजे रेल्वेच्या २१ वाघिणी, तर टू पॉर्इंट म्हणजे रेल्वेतून नेली जाणारी साखर २०० किलोमीटरच्या आत दोन ठिकाणी उतरविणे. मिनी रेक आणि टू पॉईंट वनद्वारे साखरेची वाहतूक करताना रेल्वेला कमी भाडे मिळते. त्यामुळे या दोन दोन प्रकारच्या वाहतुकीवर पाच टक्के अधिभार आकारला जात होता.
कोल्हापुरातून होणाऱ्या साखरेच्या वाहतुकीत मोठी घट
कोल्हापुरातून पश्चिम बंगाल तसेच ईशान्येकडील राज्यांत साखर मोठ्या प्रमाणात जाते. यंदा महापूर आणि अन्य कारणांमुळे कोल्हापुरातून होणारी साखरेची वाहतूक मोठ्या प्रमाणात घटली आहे. १ एप्रिल ते ३१ आॅगस्ट या काळात १ लाख ३६ हजार ५७ टन साखरेची वाहतूक झाली होती. यावर्षी ती १ एप्रिल ते ३१ आॅगस्ट या काळात फक्त २९ हजार २४४ टन इतकी झाली आहे.
महाराष्टÑातील साखर महाग
महाराष्ट्रातील साखर कारखान्यांची रेल्वेने होणारी वाहतूक घटण्याचे कारण म्हणजे व्यापाऱ्यांना उत्तर प्रदेशातील साखर पश्चिम बंगाल आणि ईशान्येकडील राज्यांत पाठविणे अंतर कमी असल्याने स्वस्त पडते. त्या तुलनेत महाराष्ट्रातील साखर अंतर जादा असल्याने महाग पडते. त्याचबरोबर महाराष्ट्रातील साखर गुजरात, राजस्थानमधील शहरांमध्ये पोहोचवण्यासाठी ट्रकचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. त्यामुळे साखरेची वाहतूक रेल्वेने होण्याचे प्रमाण कमी झाले आहे.
गतवर्षीच्या तुलनेत यंदा कोल्हापुरातून रेल्वेद्वारे होणारी साखरेची वाहतूक कमी झाली आहे. रेल्वेने दिलेल्या सवलतीचा साखर व्यापाºयांनी लाभ घ्यावा.
- एल. एन. मेश्राम
सीजीएस, कोल्हापूर रेल्वे गुड्स यार्ड