साखरेच्या दरात घसरण, मेथी, पोकळा १0 रुपयाला तीन पेंढ्या : कोंथिबीर, टोमॅटोलाही मातीमोल दर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2019 01:51 PM2019-02-04T13:51:30+5:302019-02-04T13:54:12+5:30
साखरेच्या दरातील घसरण थांबण्याचे नाव घेत नाही, घाऊक बाजारात या आठवड्यात क्विंटलमागे ५० रुपयांनी घसरण झाली आहे. भाजीपाला मार्केटमध्ये विविध भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात असून, मेथी, पोकळा या पालेभाज्यांचा दर १0 रुपयाला तीन पेंढ्या झाला आहे. कोंथिबीर, टोमॅटो तर मातीमोल किमतीने विकावा लागत आहे. फळ मार्केटमध्ये द्राक्षे, मोसंबी, चिक्कू, सफरचंद, कलिंगडेची रेलचेल पाहावयास मिळत आहे.
कोल्हापूर : साखरेच्या दरातील घसरण थांबण्याचे नाव घेत नाही, घाऊक बाजारात या आठवड्यात क्विंटलमागे ५० रुपयांनी घसरण झाली आहे. भाजीपाला मार्केटमध्ये विविध भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात असून, मेथी, पोकळा या पालेभाज्यांचा दर १0 रुपयाला तीन पेंढ्या झाला आहे. कोंथिबीर, टोमॅटो तर मातीमोल किमतीने विकावा लागत आहे. फळ मार्केटमध्ये द्राक्षे, मोसंबी, चिक्कू, सफरचंद, कलिंगडेची रेलचेल पाहावयास मिळत आहे.
यंदा साखरेच्या उत्पादनात वाढ झाली असून, त्याचा परिणाम दरावर दिसत आहे. केंद्र सरकारने प्रतिक्विंटल २९०० रुपयांपेक्षा कमी दराने साखर विक्री न करण्याचा निर्णय घेतल्याने तिथेपर्यंत साखर थांबली आहे. तरीही गेल्या आठवड्यापेक्षा घाऊक बाजारात प्रतिक्विंटल ५० रुपयांची घसरण झाली आहे; पण किरकोळ बाजारात अजूनही साखर सरासरी ३४०० रुपयांपर्यंत आहे. कोबी, वांग्यांच्या दरातही घसरण झाली असून, घाऊक बाजारात वांगी सरासरी १० रुपये किलो आहेत.
टोमॅटोची आवक स्थिर असली, तरी लालभडक टोमॅटो सरासरी ११ रुपये किलो आहे. ओल्या वाटाण्याची आवक चांगली आहे, किरकोळ बाजारात ३0 रुपये किलो दर आहे. वरणा, दोडका, गवार, ढब्बू या भाज्यांचे दर तुलनेत स्थिर आहेत. पालेभाज्यांच्या आवकेत मोठी वाढ झाली आहे. मेथी, पोकळा, पालकच्या दरात घसरण झाली आहे. किरकोळ बाजारात १0 रुपयाला तीन पेंढ्या दर आहे, तर एरव्ही २0 रुपये पेंढी असणारी कोंथिबीर १0 रुपयाला दोन पेंढ्या मिळत आहेत.
फळ मार्केटमध्ये मोसंबी, द्राक्षे, सफरचंद, डाळींब, कलिंगडेची रेलचेल आहे. डाळींब २0 रुपये, तर सफरचंद ८० रुपये किलो आहे. महिन्याभरापासून काळ्या पाटीच्या कलिंगडेची आवक सुरू आहे, २0 रुपयाला हे कलिंगड मिळत आहे. त्याबरोबरच आता हिरव्या पाटीच्या कलिंगडेची आवक सुरू झाली असून, मोठ्या कलिंगडेचा ८० रुपयांपर्यंत दर आहे. हरभरा डाळ, तुरडाळ, सरकी तेलाचे दर स्थिर आहे. ज्वारी प्रतिकिलो २५ ते ५० रुपये आहे. नारळाची आवक कमी असल्याने खोबरे व खोबरेल तेलाचे दर चढेच आहेत. कांदा, बटाट्याचे दर स्थिर आहेत. घाऊक बाजारात कांदा सरासरी ४, तर बटाटा १२ रुपये किलो आहे.
रुपयाला पिवळाधमक लिंबू
फेबु्रवारी महिना सुरू झाल्याने थंडी कमी होऊन उष्णता वाढू लागते; त्यामुळे शीतपेयांच्या मागणीत वाढ होते; पण यंदा अद्याप थंडी असल्याने लिंबूची मागणी कमी आहे. परिणामी किरकोळ बाजारात पिवळाधमक लिंबू रुपयाला मिळत आहे.
हापूसची आवक
कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत या आठवड्यात हापूस आंब्याची आवक झाली. आवकेला अजून गती नसली, तरी मागणीही फारशी नाही. समितीत चार बॉक्सची आवक झाली, सरासरी ५२५ रुपये बॉक्सचा दर राहिला आहे.