साखरेच्या दरात प्रतिक्विंटल २०० रुपयांनी वाढ
By admin | Published: August 7, 2015 10:53 PM2015-08-07T22:53:06+5:302015-08-07T22:53:06+5:30
घसरणीला ब्रेक : साखर उद्योगात आशादायक वातावरण; केंद्र सरकारकडून बफर स्टॉक करण्याचे संकेत
कोपार्डे : साखर हंगाम २०१४-१५ ला आॅक्टोबर २०१४ मध्ये सुरुवात झाली. सुरुवातीपासून साखर दरात सुरू झालेली घसरण आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सुरू होती. अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साखर उद्योगाच्या प्रश्नाबाबत सकारात्मक चर्चा करून साखर उद्योग वाचविण्यासाठी साखरेचा बफर स्टॉक करणार, असे सुतोवाच करताच साखर दराच्या घसरणीला अखेर ब्रेक लागला आहे. गेल्या तीन-चार दिवसांत साखर दरात प्रती क्विंटल १५० ते २०० रुपये वाढ झाली असल्याने साखर उद्योगात आशादायक चित्र निर्माण झाले आहे.हंगाम २०१४-१५ च्या सुरुवातीला साखरेचे दर प्रतिक्विंटल ३१०० ते ३२०० रुपये होते. हा दर ऊस दर व उत्पादन खर्च यांचा मेळ घालण्या इतपत चांगला होता. मात्र, यानंतर साखरेच्या दरात सातत्याने घसरण सुरू झाली. साखर उद्योग नियंत्रणमुक्त केल्याने बाजारात मोठ्या प्रमाणावर साखरेची आवक सुरू झाली. त्यातच ब्राझीलमधील कारखानदारांनी इथेनॉलऐवजी साखर उत्पादनाकडे लक्ष दिल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील साखरेचे दरही घसरल्याने निर्यातही ठप्प झाली.
यावर्षी केंद्र व राज्य शासनाने कोणताच धोरणात्मक निर्णय साखर उद्योगाबद्दल घेतला नाही. यामुळे आॅक्टोबर २०१४ मध्ये ३१०० ते ३२०० रुपये प्रतिक्विंटल असणारा साखरेचा दर १८५० ते १९१० रुपये प्रतिक्विंटल झाला. याचा परिणाम राज्य बँकेनेही कारखान्यांना प्रतिक्विंटल उचल देण्यास आखडता हात घेतला. आॅक्टोबर २०१४ मध्ये २८५० असणारे साखरेचे मूल्यांकन १९५० वर आल्याने साखर कारखाने कोट्यवधी रुपयांनी शॉर्टमार्जिनमध्ये आले. त्यामुळे देशभरात २१ हजार कोटी रुपये ऊस बिलापोटी साखर कारखान्यांकडे थकीत आहेत. कोल्हापूर विभागात ३५ कारखान्यांकडे सुमारे ८५० कोटी रुपये ऊस बिलांची थकबाकी आहे.
या पार्श्वभूमीवर राज्यासह देशातील खासगी साखर कारखानदारांनी एफआरपीप्रमाणे दर देऊन हंगाम सुरू करताच येणार नाही, अशी भूमिका साखर कारखानदारांची संघटना ‘इस्मा’च्या माध्यमातून केंद्रात मांडली. माजी कृषिमंत्री शरद पवार यांनीही पुढाकर घेऊन साखर उद्योग वाचविण्यासाठी केंद्राकडे पंतप्रधान व अर्थमंत्री यांच्याकडे पाठपुरावा केला. याचा परिणाम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या साखर कारखानदारांतील तज्ज्ञांच्याबरोबर नुकतीच नवी दिल्ली येथे बैठक घेऊन साखर उद्योगाच्या अडचणी जाणून घेतल्या. (वार्ताहर)
हंगाम २०१४-१५ मध्ये साखरेच्या दरातील घसरणीचा आलेख (प्रतिक्विंटल रुपयात)
आॅक्टोबर २०१४३१०० ते ३२००
नोव्हेंबर २०१४२८०० ते २९००
डिसेंबर २०१४२८०० ते २८५०
जानेवारी २०१५२७५०
फेब्रुवारी २०१५२६५०
मार्च २०१५२५००
एप्रिल २०१५२४००
मे २०१५२३००
जून २०१५२२५०
जुलै २०१५२१००
आॅगस्ट २०१५१९०५