पुढील हंगामात साखर उत्पादन घटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 11:07 PM2019-02-19T23:07:43+5:302019-02-19T23:07:47+5:30
चंद्रकांत कित्तुरे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : देशाच्या काही भागात पडलेला दुष्काळ आणि उसावर पडलेला लोकरी मावा यामुळे ...
चंद्रकांत कित्तुरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : देशाच्या काही भागात पडलेला दुष्काळ आणि उसावर पडलेला लोकरी मावा यामुळे पुढील गळीत हंगामात उसाचे उत्पादन, तसेच उताराही कमी होणार असल्याने देशातील साखरेचे उत्पादन ३०० लाख टनांच्या आत येण्याची शक्यता आहे. गेल्या तीन वर्षांतील हे निचांकी उत्पादन असेल.
जगात ब्राझीलबरोबर भारत सर्वाधिक साखर उत्पादन करणारा देश आहे. भारतात २०१७-१८ च्या हंगामात ३२२ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. चालू हंगामातही ३१५ लाख टन साखरेचे उत्पादन होईल, असा अंदाज आहे. देशाची गरज २६० लाख टन साखरेची असल्याने सध्या देशात अतिरिक्त साखरेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
ही साखर कमी करण्यासाठी सरकारने ५० लाख टन निर्यातीचे लक्ष्य ठेवले असले तरी या हंगामात सुमारे ३० लाख टनांपर्यंतच साखरेची निर्यात होईल, असा साखर उद्योगातील तज्ज्ञांचा अंदाज आहे. यामुळे पुढील हंगामाच्या सुरुवातीला देशात १२५ लाख टनांहून जादा साखर शिल्लक असणार आहे. त्यामुळे पुढील हंगामात साखरेचे उत्पादन घटले तरी त्याचा फारसा परिणाम होणार नाही.
याबाबत राष्टÑीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, देशाच्या काही भागात विशेषत: महाराष्टÑ आणि कर्नाटकात दुष्काळी परिस्थिती असल्याने ऊस लागवडीखालील क्षेत्र घटले आहे. तसेच उसावर लोकरी माव्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असल्याने उताऱ्यातही घट होणार आहे. परिणामी,
२०१९-२०च्या साखर हंगामात साखरेचे उत्पादन ३०० लाख टनांच्या आत राहील, असा अंदाज आहे.
इथेनॉलचा परिणाम दीड ते दोन वर्षांनी
अतिरिक्त साखरेवर उपाय म्हणून सरकारने इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन दिले आहे. इथेनॉल प्रकल्प उभारणी, तसेच आधुनिकीकरणासाठी विविध सवलती देऊ केल्या आहेत.
उसाचे उत्पादन घटल्यास या प्रकल्पांवर किंवा या प्रकल्पांचा साखरेच्या उत्पादनावर काही परिणाम होईल का, असे विचारता उभारणी सुरू असलेल्या प्रकल्पांतून इथेनॉल निर्मिती सुरू होण्यासाठी दीड ते दोन वर्षांचा कालावधी लागेल. त्यामुळे पुढील हंगामात याचा काहीही परिणाम होणार नाही, असे नाईकनवरे यांनी सांगितले.
साखरेच्या मूल्यांकनात १०० रुपयांची वाढ
दरम्यान , साखरेचा किमान हमीभाव ३१०० रुपये प्रतिक्विंटल निश्चित केल्याने बॅँकांनी साखरेवरील उचलीतही वाढ केली आहे. मूल्यांकनात १०० रुपयांची वाढ झाली असून, १२.५ टक्के उताºयाला ३२९३ रुपये उचल मिळणार आहे. बॅँकांकडून मिळणारी उचल, उपपदार्थांच्या पैशामुळे कारखानदारांना एफआरपी देण्यासाठी थोडासा दिलासा मिळाला असला, तरी एकरकमी एफआरपी देण्यासाठी कारखान्यांची दमछाकच होणार आहे.