साखर उत्पादन ३० लाख टनांनी घटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 07:17 PM2019-05-19T19:17:37+5:302019-05-19T19:17:42+5:30
राजाराम लोंढे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : साऱ्या महाराष्टÑाला दुष्काळाचे चटके बसू लागल्याने त्याचा परिणाम जनजीवनावर झाला आहे. ...
राजाराम लोंढे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : साऱ्या महाराष्टÑाला दुष्काळाचे चटके बसू लागल्याने त्याचा परिणाम जनजीवनावर झाला आहे. उभी पिके करपू लागल्याने उत्पादन घटणार असून, पाणीटंचाईचा सर्वाधिक फटका ऊस उत्पादनावर होणार आहे. गत हंगामाच्या तुलनेत २०१९-२० मध्ये राज्याचे साखर उत्पादन किमान ३० लाख टनांनी घटेल, असा अंदाज आहे. त्या तुलनेत देशाच्या उत्पादनावर परिणाम कमी दिसत असला, तरी ९ टक्के उत्पादन घटेल, असा अंदाज ‘इस्मा’ने वर्तवला आहे.
गेल्या दोन वर्षांपासून महाराष्टÑासह देशात उसाच्या उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. यामध्ये महाराष्टÑाचा वाटा सर्वाधिक असून, त्याचा परिणाम साखरेच्या दरावर झाला. हंगाम २०१८-१९ मध्ये तर उसाचे बंपर पीक होऊन ९५१ लाख टन उसाचे गाळप होऊन १०७ लाख टन साखरेचे उत्पादन झाले. मागील हंगामातील शिल्लक साखर आणि या हंगामातील साखर उत्पादनामुळे कारखान्यांना अग्निदिव्यातूनच पुढे जावे लागले. त्यात वाढलेली एफआरपीची रक्कम आणि साखरेच्या मागणीत झालेल्या घटीमुळे साखर ठेवण्यासाठी कारखान्यांना गोडावून कमी पडू लागली आहेत. साखर पडून राहिल्याने त्यावरील बॅँकेच्या कर्ज व्याजाचा बोझा वाढत चालल्याने कारखानदारांची चिंता वाढली आहे. मागील हंगामाएवढीच यंदाही उसाची लागवड झाल्याने आगामी हंगामातही तेवढेच साखर उत्पादन झाले, तर साखर उद्योग आर्थिक अरिष्टात सापडणार हे निश्चित आहे; पण यंदा सारा महाराष्टÑ दुष्काळात होरपळत आहे. पिण्यासह जनावरांनाही पाणी नाही, तिथे पिकांचा विषयच नाही. मराठवाडा, पश्चिम महाराष्टÑातील सातारा, सोलापूर, सांगलीतील काही तालुके, खानदेश व विदर्भातील काही जिल्ह्यांत दुष्काळाच्या झळा मोठ्या प्रमाणात बसल्या आहेत. पुणे, सोलापूर, कोल्हापूर या विभागातच मोठ्या प्रमाणात उसाचे उत्पादन घेतले जाते; पण कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांतील काही तालुके वगळता उर्वरित ठिकाणी दुष्काळाचा चटका ऊस पिकाला बसला आहे. त्याचा थेट परिणाम ऊस उत्पादनावर होईल, असा अंदाज साखर आयुक्त कार्यालयाचा आहे. मागील दोन वर्षांच्या उसाच्या उत्पादनात किमान २० टक्के घट होऊन साखर उत्पादन ८५ लाख टनापर्यंत खाली येईल, असा अंदाज आहे. महाराष्टÑाबरोबरच देशाच्या ऊस उत्पादनातही ९ टक्के घट होईल, असा अंदाज ‘इस्मा’ने वर्तवला आहे. संपलेल्या गळीत हंगामात देशात ३३० लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते, त्यात घट होऊन ३०३ लाख टनापर्यंत येईल, असा अंदाज आहे.
राज्याचे साखर उत्पादन लाख टनात
हंगाम साखरेचे
उत्पादन
२००८-०९ ४६
२००९-१० ७१
२०१०-११ ९१
२०११-१२ ९०
२०१२-१३ ८०
२०१३-१४ ७७
२०१४-१५ १०५
२०१५-१६ ८४
२०१६-१७ ४२
२०१७-१८ १०७
२०१८-१९ १०७
२०१९-२० ८५