ऊसतोडणी, वाहतूकदारांच्या मागण्या मान्य करा; अन्यथा सोमवारपासून आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2020 04:15 PM2020-09-30T16:15:58+5:302020-09-30T16:17:11+5:30
ऊसतोडणी व वाहतूकदारांचे प्रश्न गेली अनेक वर्षे प्रलंबित असून, त्यांची पूर्तता केली नाही तर सोमवार (दि. ५) पासून राज्यव्यापी आंदोलन सुरू करण्याचा इशारा भाजपचे आमदार सुरेश धस यांनी दिला.
कोल्हापूर : ऊसतोडणी व वाहतूकदारांचे प्रश्न गेली अनेक वर्षे प्रलंबित असून, त्यांची पूर्तता केली नाही तर सोमवार (दि. ५) पासून राज्यव्यापी आंदोलन सुरू करण्याचा इशारा भाजपचे आमदार सुरेश धस यांनी दिला.
कोल्हापूर जिल्हा वाहतूक चालक-मालक संघटनेच्या वतीने बुधवारी कोल्हापुरात आयोजित केलेल्या चर्चासत्रात आमदार धस ते बोलत होते. साखर कारखान्यांनी ऊसतोड मजुरांची लूट सुरू केली आहे. त्यात ऊसतोडण्याचे मशीन आल्याने मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे.
शासनाने अनेक कामगारांच्या बाबतीत कायदे केले; मात्र ऊसतोड मजुरांना वाऱ्यावर सोडले आहे. त्यांच्या सुरक्षित जीवनासाठी एक हक्काचा कायदा असणे गरजेचे आहे. यासाठी राज्यपातळीवर गोपीनाथराव मुंडे ऊसतोडणी मजूर, मुकादम, वाहतूकदार संघटना मजबूत बांधून शासनाला कायदा करण्यास भाग पाडण्याचा आमचा प्रयत्न आहे. संघटनेने शासनाकडे आमच्या मागण्या ठेवल्या आहेत. त्या मान्य केल्या नाहीत तर सोमवारपासून राज्यभर आंदोलन केले जाईल, असे आमदार धस यांनी सांगितले.
यावेळी गोकुळचे ज्येष्ठ संचालक बाबा देसाई, भाजप किसान सेलचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे, वाहतूकदार संघटनेचे अध्यक्ष धनाजी पाटील, श्रीकांत गावडे, बाबासाहेब पाटील, गोपीनाथ मुंडे ऊसतोड संघटनेचे तात्यासाहेब हुले, श्रमिक संघटनेचे दत्तोबा भांगे, पाटोदाचे नगराध्यक्ष बळिराम पोटे, बीड जिल्हा परिषदेचे सदस्य हरिबाप्पा घुमरे, बीडचे सभापती बालाजी जाधव, नगरसेवक अमोल दीक्षित, दत्ता हुले, विष्णू भाकरे, आदी उपस्थित होते.