पैसा देणारं पीक; राज्यात दहा वर्षात ऊस क्षेत्रात १० लाख एकरची वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2022 01:35 PM2022-06-17T13:35:34+5:302022-06-17T13:36:04+5:30
महाराष्ट्रातील सर्वाधिक साखर उतारा असलेल्या दहापैकी सात कारखाने कोल्हापूर जिल्ह्यातील.
विश्वास पाटील
कोल्हापूर : महाराष्ट्रात गेल्या दहा वर्षात उसाखालील क्षेत्रात दहा लाख एकराने वाढ झाली आहे. त्यामुळे सरासरी ३२ लाख टन ऊस वाढला आहे. साखर आयुक्त कार्यालयाने दिलेल्या माहितीवरून हे चित्र पुढे आले आहे. दहा वर्षात साखर कारखान्यांची संख्याही ३० ने वाढली आहे. कारखान्यांची गाळप क्षमता दिवसाला ३ लाख टनांनी वाढली आहे. हुकमी पैसा मिळवून देणारे पीक म्हणून शेतकरी उसाकडे मोठ्या प्रमाणावर वळत असल्याचेच त्यातून दिसत आहे.
जिथे पाणी आले तिथे ऊस वाढला असे राज्यभरातील सर्वसाधारण चित्र दिसते. महाराष्ट्राच्या २०१२-१३ च्या हंगामात उसाखालील क्षेत्र ९.६४ लाख हेक्टर होते. तेच आज १३.६७ लाख हेक्टर आहे. म्हणजेच तब्बल ४.०३ लाख हेक्टर (दहा लाख एकर) क्षेत्र वाढले. शेतकरी सिंचनाची सोय झाली की ऊसपीक घेतो. त्यासाठी फारसे कष्ट नाहीत. बियाण्यापासून खतापर्यंत सगळे सहज उपलब्ध होते. कायद्याने हमीभाव मिळण्याची सोय आहे. त्याला पिकवलेला ऊस बाजारात विकायला जावा लागत नाही. निसर्ग कितीही कोपला तरी पिकाचे मर्यादित नुकसान होते. या कारणांमुळे शेतकरी या पिकाकडे वळत असल्याचे चित्र प्रामुख्याने दिसते.
सोलापूर, अहमदनगर, पुणे, उस्मानाबाद, लातूर, औरंगाबाद, परभणी, नांदेड, बीड या जिल्ह्यात उसाचे क्षेत्र वाढल्याचे चित्र आहे. याउलट तृणधान्ये (११ टक्के), कडधान्ये (२७ टक्के) व तेलबिया (१३ टक्के) पिकाखालील क्षेत्र कमी होत असल्याचे आर्थिक पाहणी अहवाल सांगतो. मावळत्या हंगामात महाराष्ट्रात सर्वाधिक २४ लाख ७८ हजार टन ऊस गाळप सोलापूर जिल्ह्यातील माढा येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी कारखान्याने केले आहे.
साखर उताऱ्यात कोल्हापूर भारी..
महाराष्ट्रातील सर्वाधिक साखर उतारा असलेल्या दहापैकी सात कारखाने कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. बिद्री कारखाना १२.९९ उताऱ्यासह सर्वोच्चस्थानी आहे. त्याशिवाय पंचगंगा (रेणुका शुगर्स), शाहू कागल, अथनी शुगर्स भुदरगड, ओलम चंदगड, भोगावती परिते, कुंभीकासारी कुडित्रे व इको केन चंदगड यांचा त्यामध्ये समावेश आहे.
१८६९ कोटी रुपये एफआरपी थकीत
राज्यातील १९९ पैकी ६५ कारखान्यांनी शंभर टक्के एफआरपी दिली आहे. १३४ कारखान्यांकडे १८६९ कोटी रुपये एफआरपी थकीत आहे. चार कारखान्यांवर एफआरपी वसुलीसाठी आरआरसीची कारवाई करण्यात आली आहे.
हंगाम दृष्टिक्षेपात..
एकूण गाळप - १३ कोटी २० लाख टन
साखर उत्पादन - १३७ लाख टन
सरासरी उतारा : १०.४० टक्के
सरासरी गाळप दिवस : १७३
जास्तीत जास्त गाळप दिवस : २४०
कमीतकमी गाळप दिवस - ३६