पुरामुळे ४२ हजार हेक्टरमधील ऊस धोक्यात
By admin | Published: August 9, 2016 12:18 AM2016-08-09T00:18:11+5:302016-08-09T00:23:35+5:30
गेले पाच दिवस पाण्याखाली : उत्पादनावर परिणाम होणार असल्याने साखर हंगाम अडचणीत
राजाराम लोंढे -- कोल्हापूर --पंचगंगा, भोगावतीसह इतर नद्या, ओढे-नाल्यांच्या पुराच्या पाण्याखाली सुमारे ४२ हजार हेक्टर उसाचे क्षेत्र गेले आहे. गेले पाच-सहा दिवस उसाच्या शेंड्यात गाळमिश्रित पाणी व चिखल बसल्याने कुजण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आधीच दुष्काळात कसरत करत वाढविलेला ऊस पुराच्या पाण्यात गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्याचा फटका आगामी साखर कारखान्यांच्या हंगामाला बसणार आहे.
यंदा जिल्ह्यात जानेवारीपासूनच पाणीटंचाईच्या झळा शेतकऱ्यांना सोसाव्या लागल्या. धरणात पाणी नसल्याने पाटबंधारे विभागाने सहा महिने कपातीचे धोरण अवलंबले. एप्रिलनंतर तर कपातीचा फास जास्त आवळल्याने उसाची उभी पिके करपली. त्यातून कशी-बशी जगवलेली पिके अतिवृष्टीने उद्ध्वस्त झाली. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात पूर आला आणि नदीकाठची सर्वच पिके पाण्याखाली गेली. त्यावेळी धरणांतून पाण्याचा विसर्ग नसल्याने पुराचे पाणी दोन-तीन दिवसांतच पात्रात गेले. त्यानंतर गेले आठ दिवस धुवाधार पावसाने नद्यांना पूर आला. पंचगंगा, भोगावती, कुंभी, कासारी, हिरण्यकेशी, घटप्रभा, वारणा या नद्यांच्या पात्राशेजारी असणारे ऊस, भात ही पिके पाण्याखाली गेली आहेत. विशेषत: उसाचे क्षेत्र पाण्याखाली गेले असून साधारणत: गुरुवारपासून ऊस पाण्याखाली असल्याने धोका निर्माण झाला आहे. पावसाचा जोर ओसरला असला तरी धरणांतून विसर्ग सुरू असल्याने पंचगंगा नदीला फूग आहे.
गेल्या पाच-सहा दिवसांपेक्षा अधिक काळ पाण्याखाली ऊस असल्याने कुजण्याची प्रक्रिया वेगाने होऊ लागली आहे. जरी उसाचे शेंडे पाण्याच्या वर असतील तर त्या उसाचे २० ते ३० टक्के उत्पादन घटते. शेंडे जर पाण्यात राहिले तर संपूर्ण नुकसान होते. जिल्ह्णात साधारणत: १ लाख ४० हजार हेक्टर उसाचे क्षेत्र आहे. त्यापैकी सुमारे ४२ हजार हेक्टर क्षेत्र नदीकाठावर असल्याने येथील ऊस धोक्यात आला आहे.
अडसाल खोळंबल्या!
साधारणत: कोल्हापूर जिल्ह्यात आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात उसाच्या आडसाल लावणीस सुरुवात होते. त्यामध्ये नदीकाठच्या जमिनीत आडसाल लावणीचे प्रमाण अधिक असते.
पण जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासूनच पावसाचा तडाखा असल्याने उसाच्या लावणी खोळंबल्या आहेत, तर ज्यांनी जुलैच्या शेवटच्या आठवड्यात लावणी केल्या आहेत, तिथे सरीत पाणी तुंबल्याने बियाणे कुजले आहे.
उसाच्या शेंड्यात गाळमिश्रित पाणी, चिखल बसल्याने शेंडे कुजण्याची प्रक्रिया जलदगतीने होते. जमिनीत अन्नद्रव्यांचे स्थिरीकरण होऊन रासायनिक सुपीकता कमी होऊन उसाची वाढ खुंटते; यासाठी नत्र, स्फूरद, पालाश यांचा वापर करावा.
- डॉ. एस. एम. मोरे,
ऊस संशोधन केंद्र
या कराव्यात उपाययोजना
पूरबुडित क्षेत्रातील साचलेले पाणी चरीद्वारे बाहेर काढावे.
उसाला कोंब फुटण्याची शक्यता असते. अशावेळी साखर कारखाने सुरू होईपर्यंत कोंब काढावेत.
किडींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एकरी सहा किलो फोरेट १० जी दाणेदार खत सरीमध्ये टाकावे.
उसाची कुजलेली पाने सरीत टाकून हवा खेळती करावी.
ऊस जमिनीवर पडले असल्यास ते सरळ करावेत.
एकरी दहा किलो झिंक सल्फेट सेंद्रिय खतांमधून द्यावे.
पुराच्या पाण्याला ६७१, ९२००५ कमकुवत
जिल्ह्यात जास्त साखर उत्पादन देणारे वाण म्हणून ६७१, ९२००५ व ८६०३२ याचे उत्पादन अधिक आहे; पण यापैकी ६७१ व ९२००५ हे वाण पुराच्या पाण्याला एकदम कमकुवत आहेत.
पाणी येणाऱ्या ठिकाणी ७५२७, ८०८४ हे वाण पुराच्या पाण्याला फारशी दाद देत नाहीत. त्यामुळे या वाणाच्या लावणीकडे शेतकऱ्यांनी वळणे गरजेचे आहे.