साखर कारखाने आजपासून बंद ऊसदराचा प्रश्न : शासनाकडे मदतीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 12:55 AM2018-10-31T00:55:57+5:302018-10-31T01:00:01+5:30

कोल्हापूर : शेतकरी संघटनांनी केलेली ऊसदराची मागणी, बॅँकांकडून मिळणारी उचल यांचा ताळमेळ बसत नसल्याने हंगाम चालविणे अडचणीचे आहे. त्यामुळे ...

Sugarcane factory closed today's question: Need help from the government | साखर कारखाने आजपासून बंद ऊसदराचा प्रश्न : शासनाकडे मदतीची मागणी

साखर कारखाने आजपासून बंद ऊसदराचा प्रश्न : शासनाकडे मदतीची मागणी

Next
ठळक मुद्देयंदा सरकार या प्रश्नांत सहकार्याची भूमिका घेईल असे दिसत नाहीवाढीव २०० रुपये न मिळाल्याने ते रोषाचे बळी ठरले आहेत.

कोल्हापूर : शेतकरी संघटनांनी केलेली ऊसदराची मागणी, बॅँकांकडून मिळणारी उचल यांचा ताळमेळ बसत नसल्याने हंगाम चालविणे अडचणीचे आहे. त्यामुळे तुटलेला ऊस गाळप करून आज, बुधवारपासून कारखाने बंद ठेवण्याचा निर्णय साखर कारखानदारांच्या कोल्हापुरात झालेल्या बैठकीत मंगळवारी घेण्यात आला.
शासनाच्या मदतीशिवाय हंगाम सुरू करणे अशक्य असल्याचे मतही अनेक कारखानदारांनी व्यक्त केले. अशा स्थितीत शेतकऱ्यांचा वाईटपणा कारखानदारांनी घ्यायला नको म्हणून तोडगा निघेपर्यंत धुराडी बंद करण्याचे ठरले.

‘रयत क्रांती’ शेतकरी संघटनेने एफआरपी अधिक २०० रुपये, ‘स्वाभिमानी शेतकरी संघटने’ने विनाकपात ३२१७ रुपये, तर शेतकरी संघटनेने एकरकमी ३५०० रुपयांची मागणी केली आहे. जिल्ह्यातील संताजी घोरपडे, ‘राजाराम’सह इतर कारखान्यांनी गळीत हंगाम सुरू केला आहे. त्यामुळे शेतकरी संघटना आक्रमक झाली असून, त्यांनी तोडण्या रोखण्यास सुरुवात केल्याने संघर्ष निर्माण झाला आहे. कर्नाटकातील कारखाने सुरू झाल्याने सीमाभागातील ऊस तिकडे जात आहे. त्याचा फटका येथील कारखान्यांना बसणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी जिल्ह्यातील साखर कारखानदारांची जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.

सध्या साखरेचा दर २९ रुपये आहे. बॅँकांकडून ८५ टक्क्यांप्रमाणे मिळणारी उचल आणि शेतकरी संघटनांची मागणी यांचा ताळमेळ बसत नाही. ऊसतोडणी-वाहतूक खर्च, मागील हंगामातील कर्जाचे हप्ते द्यावे लागणार आहेत. त्यामुळे शेतकरी संघटनांच्या मागण्यांप्रमाणे सध्या तरी दर देणे अशक्य असल्याने हंगाम बंद ठेवणेच योग्य होईल, असे कारखानदारांनी सुचविले. अशा परिस्थितीत शासनाने मदत करावी, त्यांच्या मदतीशिवाय हंगाम सुरू होणे अशक्य आहे, असा बैठकीत निर्णय घेतला. बैठकीला ‘दत्त-शिरोळ’चे अध्यक्ष गणपतराव पाटील, ‘हमीदवाडा’ कारखान्याचे अध्यक्ष प्रा. संजय मंडलिक, ‘राजाराम’चे अध्यक्ष हरीश चौगले, ‘गुरुदत्त’चे अध्यक्ष माधवराव घाटगे, ‘भोगावती’चे उपाध्यक्ष उदयसिंह पाटील, ‘जवाहर’चे उपाध्यक्ष विलास गाताडे, ‘शाहू’चे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण, साखर तज्ञ पी. जी. मेढे, आदी उपस्थित होते.


हे देखील महत्त्वाचे कारण
दिवाळीचा सण तोंडावर असल्याने ऊस तोडणी टोळ््या अजून मराठवाड्यातून आलेल्या नाहीत. त्यामुळे संघटनेचा रोष ओढवून घेण्यापेक्षा हंगामच बंद ठेवून दबाव वाढवण्याचाही हेतू कारखाने बंद करण्यामागे आहे. यंदा सरकार या प्रश्नांत सहकार्याची भूमिका घेईल असे दिसत नाही. कारण गेल्या हंगामात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मध्यस्थी केली, परंतु वाढीव २०० रुपये न मिळाल्याने ते रोषाचे बळी ठरले आहेत.

सातारा, सांगलीतही कारखाने बंद
कोल्हापुरातील कारखानदारांच्या बैठकीतील निर्णयाबद्दल आमदार हसन मुश्रीफ यांनी सांगली व सातारा जिल्ह्यांतील कारखानदारांशी फोनवरून चर्चा केली. त्यांनीही शासन मदत देत नाही तोपर्यंत हंगाम सुरू न करण्याचा निर्णय घेतला आहे.

Web Title: Sugarcane factory closed today's question: Need help from the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.