एफआरपीत प्रतिटन १५० रुपयांची वाढ, कृषी मूल्य आयोगाची शिफारस
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2022 12:46 PM2022-06-03T12:46:28+5:302022-06-03T13:08:10+5:30
एका बाजूला रासायनिक खतांच्या दरात वर्षभरात दुपटीने वाढ झाल्याने उसाचा उत्पादन खर्चही वाढला आहे. त्यामुळे ही वाढ शेतकऱ्यांच्या दृष्टीने अपुरीच आहे
कोल्हापूर : आगामी गळीत हंगामासाठी उसाच्या एफआरपीत प्रतिटन १५० रुपये वाढ करून ती ३,०५० रुपये करण्याची आणि १०.२५ टक्के बेस रेट धरून पुढील प्रत्येक टक्का उताऱ्याला प्रतिटन ३०५ रुपये वाढ देण्याची शिफारस केंद्रीय कृषी मूल्य आयोगाने केली आहे. ही शिफारस केंद्रीय अन्न मंत्रालयाने गुरुवारी केंद्रीय मंत्रिमंडळाकडे पाठविली असल्याचे समजते. ही शिफारस मंजूर झाली, तर कोल्हापूर जिल्ह्याचा सरासरी १२.५० टक्के उतारा गृहित धरला, तर ३,७३६ रुपये एफआरपी होते. त्यातून सरासरी ७२५ रुपये तोडणी-ओढणी वजा जाता निव्वळ एफआरपी ३,०११ रुपये ऊस उत्पादकांच्या पदरात पडणार आहे.
गेल्यावर्षी १० टक्के उताऱ्याला २,९०० रुपये एफआरपी निश्चित केली होती. त्यात २०२०च्या तुलनेत केवळ ५० रुपये वाढ झाली होती; तर पुढील प्रत्येक टक्क्यातही केेवळ ५ रुपयांची वाढ करून ती २८५ वरून २९० केली होती. यावर्षी गतवर्षीपेक्षा १५० रुपयांची वाढ दिसत असली, तरी उताऱ्याचा बेस रेट ०.२५ टक्के वाढविल्याने प्रत्यक्षातील वाढ १०० रुपयेच होते. एका बाजूला रासायनिक खतांच्या दरात वर्षभरात दुपटीने वाढ झाल्याने उसाचा उत्पादन खर्चही वाढला आहे. त्यामुळे ही वाढ शेतकऱ्यांच्या दृष्टीने अपुरीच आहे.
कोल्हापूर जिल्ह्याची एफआरपी ३०११ रुपये
कोल्हापूर जिल्ह्याचा सरासरी १२.५० टक्के साखर उतारा गृहित धरता, गेल्यावर्षी एफआरपी ३,६३१ रुपये होती, त्यातून ६७९ रुपये तोडणीचा खर्च वजा जाता, २,९०० रुपये शेतकऱ्यांना मिळाले होते. यावर्षी १२.५० टक्के उताऱ्याला ३,७३६ रुपये एकूण एफआरपी असणार आहे, पण त्यातून तोडणी-वाहतूक खर्च सरासरी ७२५ रुपये वजा जाता शेतकऱ्यांच्या हातात ३,०११ रुपये पडणार आहेत.
कृषी मुल्य आयोगाने वाढीव एफआरपी देण्याची शिफारस केली हे चांगलेच झाले कारण शेतकऱ्यांचा खर्चही वाढला होता. साखर उद्योग साखरेचा खरेदी दरही ३१ वरून किमान ३६ रुपये करावा यासाठी गेली चार वर्षे मागणी करत आहे. परंतू त्याकडे केंद्र सरकार जाणीवपूर्वक कानाडोळा करत आहे. साखरेला किंमत मिळाल्याशिवाय ऊसाची बिले देण्यासाठी कारखानदारी पैसे कोठून आणणार याचाही विचार व्हायला हवा. - पी.जी.मेढे, साखर उद्योग तज्ञ
उतारानिहाय एफआरपी
उतारा | एकूण एफआरपी | तोडणी खर्च | निव्वळ एफआरपी |
१०.२५ | ३०५० | ७२५ | २३२५ |
११.५० | ३४३१ | ७२५ | २७०६ |
१२.०० | ३५८४ | ७२५ | २८५९ |
१२.५० | ३७३६ | ७२५ | ३०११ |
१३.०० | ३८८९ | ७२५ | ३१६४ |