सीमाभागात उसाची पळवापळवी, महाराष्ट्रातील कारखानदार निवडणुकीच्या रणांगणात मग्न

By भीमगोंड देसाई | Published: November 14, 2024 03:17 PM2024-11-14T15:17:58+5:302024-11-14T15:18:53+5:30

भीमगोंडा देसाई  कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीच्या प्रचार फडात जिल्ह्यातील कारखानदार असल्याने जिल्ह्यातील साखर कारखान्यांची धुराडी बंदच आहेत. ऊसतोडीचा हंगाम ...

Sugarcane scampering in the border area, Maharashtra factory owner engaged in election | सीमाभागात उसाची पळवापळवी, महाराष्ट्रातील कारखानदार निवडणुकीच्या रणांगणात मग्न

सीमाभागात उसाची पळवापळवी, महाराष्ट्रातील कारखानदार निवडणुकीच्या रणांगणात मग्न

भीमगोंडा देसाई 

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीच्या प्रचार फडात जिल्ह्यातील कारखानदार असल्याने जिल्ह्यातील साखर कारखान्यांची धुराडी बंदच आहेत. ऊसतोडीचा हंगाम लांबला आहे. याचा फायदा घेत सीमा भागातील बेळगाव जिल्ह्यातील आठ साखर कारखाने सुरू झाले आहेत. यांच्याकडून जिल्ह्यातील ऊसतोडी सुरू केल्या आहेत. ते उसाची पळवापळवी करीत आहेत. गेल्या हंगामापर्यंत कारखानदार शेतकरी संघटना आंदोलन करून कारखाने वेळेत सुरू करू देत नाहीत, असा आरोप करीत होते. यंदा शेतकरी संघटनांनी आंदोलनाचे हत्यार उपसलेले नाही. तरीही कारखानदार हंगामाला सुरुवात केलेली नाही. ऊसतोडी करण्यापेक्षा राजकीय फडातच ते व्यस्त आहेत.

कोल्हापूर आणि बेळगाव जिल्ह्यातील सीमेलगतच्या साखर कारखान्यांची नोंदणी बहुराज्य असल्याने ते महाराष्ट्र, कर्नाटकातील ऊस गाळप करतात. कोल्हापूर जिल्ह्यात २३ साखर कारखाने आहेत. यातील चंदगड, गडहिंग्लज, कागल, इचलकरंजी, हातकणंगले, शिरोळ आदी परिसरातील साखर कारखाने दरवर्षी बेळगाव जिल्ह्यातील ऊस मोठ्या प्रमाणात गाळप करतात. पण यंदा विधानसभेच्या निवडणूक रिंगणात पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखानदार प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष सहभागी असल्याने अजून गाळप हंगाम सुरू केलेला नाही.

याउलट बेळगाव जिल्ह्यातील महाराष्ट्र सीमेजवळील संकेश्वर, निपाणी, बेडकीहाळ, चिक्कोडी, शिवशक्ती, अरिहंत-चिक्कोडी, उगार शुगर्स, अथणी शुगर्स, कृष्णा- अथणी हे साखर कारखाने ९ नाेव्हेंबरला सुरू झाले आहेत. या कारखान्यांच्या ऊसतोडीच्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात या कारखान्यांची ऊसतोड सुरू झाली आहे. यामुळे यंदा ऊसतोडीत बेळगाव जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी आघाडी घेतली आहे.

यंदाही ऊस पिकासाठी सुरुवातीपासून वातावरण प्रतिकूल राहिले. परिणामी उसाची अपेक्षित अशी वाढ झालेली नाही. यामुळे उसाच्या उत्पादनातही घट येईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या एप्रिल, मे महिन्यात उन्हाळा तीव्र असल्याने सीमा भागातील ऊस वाळला. वाळलेला ऊस संबंधित शेतकऱ्यांनी जनावरांना कापून घातला. उसाचे क्षेत्र घटले. म्हणून सीमा भागातील कारखाने आपला गाळप हंगाम यशस्वी करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील अधिकाधिक ऊस नेण्याचे नियोजन केल्याचे सध्या आलेल्या ऊस तोडणी मजुरांच्या टाेळ्यांवरून दिसत आहे.

मध्यप्रदेश, बिहारहून मजूर

महाराष्ट्र आणि कर्नाटकातील बेळगाव, बागलकोट, मंड्या या भागात प्रत्येक वर्षी ऊसतोडणी मजूर विदर्भ, मराठवाडा भागातून जातात. पण येथील ऊसतोडणी मजुरांनाही प्रचाराचे स्थानिक पातळीवरच काम मिळाले आहे. यामुळे बेळगाव जिल्ह्यातील कारखानदारांनी यंदा मध्यप्रदेश, बिहार येथून ऊसतोडणी मजूर आणले आहेत.

Web Title: Sugarcane scampering in the border area, Maharashtra factory owner engaged in election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.