ऊसाचा हंगाम अन् अपघातांना निमंत्रण नित्याचेच..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 05:03 PM2020-12-03T17:03:18+5:302020-12-03T17:05:28+5:30
accident, Sugar factory, kolhapur ऊस हंगाम सुरू झाला की मुख्य प्रश्न निर्माण होतो तो वाहतुकीची कोंडी आणि अपघात रोखणे. ऊस हंगामाच्या सुरूवातीपासून अनेक अपघातांना निमंत्रण मिळत आहे. त्याचा प्रत्यय गडहिंग्लज तालुकावासियांना येत असून गेल्या पंधरा दिवसात तिघाजणांना आपण जीव गमवावा लागला आहे.
शिवानंद पाटील
गडहिंग्लज- ऊस हंगाम सुरू झाला की मुख्य प्रश्न निर्माण होतो तो वाहतुकीची कोंडी आणि अपघात रोखणे. ऊस हंगामाच्या सुरूवातीपासून अनेक अपघातांना निमंत्रण मिळत आहे. त्याचा प्रत्यय गडहिंग्लज तालुकावासियांना येत असून गेल्या पंधरा दिवसात तिघाजणांना आपण जीव गमवावा लागला आहे.
अडकूर (ता. चंदगड) येथील कादर आदम कोवाडकर (वय ४५, रा. अडकूर, ता. चंदगड) हे दुचाकीने गडहिंग्लजहून घरी परतत होते. हरळीनजीक ट्रॅक्टर ट्रॉलीला ओव्हरटेक करताना ट्रॉलीचा अॅक्सेल तुटल्याने डब्यातील संपूर्ण ऊसच त्यांच्यावर कोसळून त्यांचा जागीच मृत्यू झाला.
मंगळवारी (१) नूल (ता. गडहिंग्लज) येथे भल्या पहाटे जनावरांना सायकलीवरून वाडे आणण्यासाठी जाणाऱ्या शाहरूख सनदी (वय २४) या तरूणाचा ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने दिलेल्या धडकेत प्राण गमवावा लागला.
बुधवारी (२) गडहिंग्लज-उत्तूर मार्गावर उत्तूरचे कापड व्यापारी दत्तात्रय पाटील यांच्या दुचाकीने ट्रॅक्टर ट्रॉलीला धडक दिल्याने त्यांचाही जागीच मृत्यू झाला.
ऊस वाहतूक करणारे ट्रक, ट्रॅक्टर-ट्रॉली सुस्थितीत नसणे, क्षमतेपेक्षा अधिक ऊसाची वाहतूक करणे, वाहनांमध्ये मोठ्याने टेप लावणे, वाहनांच्या पाठीमागील बाजूस रिपलेक्टर न लावणे, रिकामे ट्रॅक्टर व ट्रक वेगाने पळविणे आदी कारणामुळे अपघातांना निमंत्रण मिळत आहे. त्यामुळे वाहतूक प्रशासनानेही वाहनांची तपासणी करून नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे.
वाहतुकीची कोंडी
आजरा, चंदगड, संकेश्वर, गारगोटी, निपाणीकडे जाण्यासाठी शहरातील गडहिंग्लज-संकेश्वर-आजरा या एकाच मुख्य रस्त्यावरून वाहतूक होते. याच मुख्य रस्त्यावर शासकीय कार्यालये, वाचनालय, बाजारपेठ, नगरपालिका, पोलिस ठाणे असल्याने याठिकाणी कामानिमित्त येणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यातच ऊसाची वाहतूकही या मार्गावरून होत असल्याने या मार्गावर जीव मुठीत घेवूनच वाहने चालवावी लागतात.
रिंगरोड हाच उपाय
शहरातील मुख्य रस्त्यावर होणारी वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी शहरातून अन्य ठिकाणी जाणाऱ्या सर्व वाहनांसाठी पर्यायी मार्गाची सोय होणे गरजेचे आहे. त्यासाठी शहरातील प्रलंबित रिंगरोडचे काम पूर्ण होणे आवश्यक आहे.