पस्तीस हजार सभासदांची सवलत साखर बंद होणार
By Admin | Published: December 31, 2016 12:14 AM2016-12-31T00:14:57+5:302016-12-31T00:14:57+5:30
बिद्री साखर कारखाना : ऊस पुरवठा होत नसल्याने प्रशासनाकडून हालचाली
सरवडे : बिद्री साखर कारखान्याचे सुमारे ७0 हजार सभासद आहेत. यापैकी सुमारे ३५ हजार सभासदांच्या नावे कारखान्यास ऊसच येत नाही, अशा सभासदांना देण्यात येणारी सवलतीची साखर व अन्य सुविधांसंबंधी कठोर निर्णय घ्यावेत, अशा तक्रारी आल्याने अशा सभासदांबाबत प्रशासन पातळीवर निर्णय घेण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. यासंबंधी प्रशासकीय अध्यक्ष यांनीही दुजोरा दिला.
राधानगरी, भुदरगड, कागल व करवीर तालुक्यांतील २१८ गावांचा समावेश या साखर कारखान्यात आहे. त्या त्यावेळी सत्ताधारी संचालक मंडळाने सभासद वाढीचा निर्णय घेतला. सध्या ही सभासद संख्या ७0 हजारांच्या घरात आहे. कारखाना कार्यक्षेत्रात बारमाही पाण्यामुळे मुबलक ऊस उत्पादन आहे, तर पश्चिम महाराष्ट्रात साखर दरात कारखाना अग्रेसर असताना निम्म्याहून अधिक सभासद कारखान्यास ऊस पाठवित नाहीत. तर एका-एका कुटुंबातील चार ते दहा सभासद आहेत. मात्र, एक ते दोन सभासदांच्या नावेच ऊस येताना दिसतो. यावर्षी कार्यक्षेत्रात ११ लाख मे. टन उसाची उपलब्धता आहे. मात्र, शेत मोकळे करून अन्य पीक घेण्यासाठी किंवा तोडणीस थोडा विलंब होत असल्याने शेतकरी अन्य कारखान्यास ऊस पाठवित आहेत.
बिद्री साखर कारखाना गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करणार आहे. मात्र, अधिक गाळप झाले, तर उसाला चांगला दर मिळेल. बगॅस वाढला, तर त्याच्यातून वीजनिर्मिती होईल. सभासदांनाच चार पैसे जादा मिळतील, अशी स्थिती असताना सभासद घाईगडबडीत ऊस तोडून अन्य कारखान्यांना पाठवित आहेत.
कारखान्यात यापूर्वी राजकीय हेवेदावे असल्याने उसाची उचल वेळेत होत नसे. मात्र, यावर्षी सन २0१६ चा गळीत हंगाम पूर्ण प्रशासक सांभाळत आहे. तरीही कारखान्यास एकूण सभासदांपैकी निम्म्याहून अधिक सभासदांच्या नावावरील ऊस कारखान्यास आलेला नाही. याची नोंद प्रशासकांनी घेतल्याचे वृत्त आहे. अशा सभासदांवर कठोर कारवाई होणार आहे. (वार्ताहर)
बिद्री साखर कारखाना मातृसंस्था मानून ३५ हजारांहून अधिक सभासद सातत्याने कारखान्यास ऊस पुरवठा करतात. त्यापैकी काही सभासदांनी तक्रार केल्याने ही तक्रार योग्य असल्याने साखर कारखान्यास ऊस पुरवठा न करणाऱ्या सभासदांना मिळणाऱ्या सवलतीच्या साखरेसंबंधी काही धोरणात्मक निर्णय घेण्याच्या विचारात आहोत.
-अरुण काकडे, प्रशासकीय अध्यक्ष, बिद्री साखर कारखाना