उसाला चांगला भाव मिळेल

By admin | Published: October 21, 2016 01:38 AM2016-10-21T01:38:05+5:302016-10-21T01:49:51+5:30

फरांडेबाबांची भाकणूक : पट्टणकोडोलीत लाखोंच्या उपस्थितीत विठ्ठल बिरदेव यात्रा

Sugarcane will get a good price | उसाला चांगला भाव मिळेल

उसाला चांगला भाव मिळेल

Next

इरफान मुजावर -- पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथील प्रसिद्ध श्री विठ्ठल-बिरदेव यात्रेस गुरुवारी लाखो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. ढोल-ताशांच्या निनादात श्री विठ्ठल-बिरदेवाच्या नावानं चांगभलंच्या गजरात श्री फरांडेबाबांनी ‘हेडाम’ सोहळ्याचे दर्शन घडविले. यावेळी प्रसिद्ध भाकणूकही झाली.
खेलोबा वाघमोडे (फरांडेबाबा) महाराज हेडाम खेळत मंदिरात आले. त्यांनी देवाचे दर्शन घेतले. श्री विठ्ठल-बिरदेवाच्या नावानं चांगभलं असा गजर करीत त्यांनी भाकणूक केली. रोहिणीचा पाऊस, मृगाचा पेरा, खळ्याकाठी बैलाच्या खुरी, धारण दोन सव्वा दोन रसभांडे कडक होईल, मिरची, गूळ, हरभरा कडक होईल, रोगराई कानानं ऐकाल, डोळ्यानं पहाल, अहंकार कराल तर सर्वनाश होईल, अशी भाकणूक फरांडेबाबांनी केली.
प्रसिद्ध भाकणूक करणारे फरांडेबाबा मंदिरासमोरील दगडी गादीवर विराजमान झाले होते. सकाळपासूनच ढोल वादनाने परिसर दणाणून गेला होता. भंडारा, खारका, खोबरे, लोकर यांच्या उधळणीने वातावरण भक्तिमय बनले होते. मंदिर परिसर सोन्याने ल्याल्यासारखा भासत होता. भाकणुकीसाठी विविध राज्यांतून लाखो भाविक मिळेल त्या वाहनाने पट्टणकोडोलीत दाखल झाले होते. त्यामुळे गावाला जनसागराचे रूप आले होते.
दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास मुख्य धार्मिक विधीस प्रारंभ झाला. गावचावडीत गावकामगार पाटील प्रकाश पाटील यांच्या हस्ते मानाच्या तलवारीचे, शस्त्रांचे पूजन झाले. यावेळी मानकरी, गावडे, चौगुले, कुलकर्णी, समस्त पुजारी, धनगर समाज, ग्रामस्थ उपस्थित होते. भानस मंदिरात दर्शन घेतल्यानंतर मुख्य श्री विठ्ठल-बिरदेव मंदिरात सर्वजण आले. तेथे दर्शन घेतल्यानंतर फरांडेबाबांना निमंत्रित करण्यासाठी मानकरी गेले. त्यांच्याबरोबर मानाचा घोडा, छत्र्या, ढोल-कैताळांचा लवाजमा होता. परंपरेनुसार प्रकाश पाटील यांनी फरांडेबाबांना आलिंगन देऊन निमंत्रित केले. यावेळी मोठ्या प्रमाणावर भंडाऱ्याची उधळण सुरू होती.
दुपारी अडीच वाजता श्री फरांडेबाबा हातात धारदार तलवार घेऊन उभे राहिले. श्री विठ्ठल-बिरदेवाच्या नावानं चांगभलंचा प्रचंड गजर सुरू होता. ऐतिहासिक ‘हेडाम’ सोहळा पाहण्यासाठी लाखो भाविक स्तब्ध झाले. मानाच्या छत्र्या श्री फरांडेबाबा यांच्यावर फिरविण्यात आल्या. त्यानंतर पोटावर मानाच्या तलवारीचे वार करीत फरांडेबाबा हेडाम खेळत मंदिराची प्रदक्षिणा घालून मंदिरात आले. त्यानंतर भाकणूक झाली. लाखो भाविकांची उपस्थिती असतानाही भाकणूक होताना पूर्णपणे शांतता होती. भाकणूक झाल्यानंतर फरांडेबाबा दर्शन घेऊन मंदिरामागील दगडी गादीवर विराजमान झाले. यात्रेसाठी महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, आदी राज्यांतून लाखो भाविक येथे आले आहेत.
भाकणूक सोहळ्यादरम्यान कोल्हापूर, इचलकरंजी, कागल, हुपरी या मार्गांवर वाहतुकीची कोंडी झाली होती. वाहनांचा प्रचंड ताफा या भागात होता. परिवहन विभागाने विविध भागांतून जादा बसेस सोडल्या होत्या, तसेच तात्पुरते बसस्थानकही उभारले होते. वीज मंडळाने अखंडित वीजपुरवठा केला होता. परिसरात मोठ्या प्रमाणावर भंडारा, खारका, नारळ, भांडी, खेळणी, मेवा मिठाई, घोंगडे यांची दुकाने मोठ्या प्रमाणात आली आहेत. यात्रेत लाखो रुपयांची उलाढाल झाली. जागोजागी बाहेरगावच्या भाविकांनी धनगरी ओव्यांचे कार्यक्रम सादर केले. त्यामुळे भागात भक्तिमय वातावरण निर्माण झाले. हुपरी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक शशिकांत सावंत व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.

Web Title: Sugarcane will get a good price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.