Kolhapur: एकरकमी ३५०० टाका, मगच ऊसाला कोयता लावा; ऊस परिषदेत राजू शेट्टींची घोषणा
By विश्वास पाटील | Published: November 7, 2023 07:19 PM2023-11-07T19:19:12+5:302023-11-07T19:31:13+5:30
शेतकऱ्याची दिवाळी गोड होणार नाही. म्हणून मी सुध्दा स्वत:च्या घराकडे जाणार नाही. याच मैदानावर मी १५ नोव्हेंबरपर्यंत ठिय्या आंदोलन करणार
संदिप बावचे
जयसिंगपूर: गेल्या हंगामात तुटलेल्या ऊसाला एफआरपी शिवाय टनास ४०० रुपये जास्त मिळाल्याशिवाय जयसिंगपूरच्या विक्रमसिंह मैदानावरून उठणार नाही असा नवा एल्गार माजी खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवारी येथे झालेल्या बावीसाव्या विराट ऊस परिषदेत केला. चालू हंगामातील ऊसाला एकरकमी ३५०० उचल मिळाल्याशिवाय ऊसाला कोयता लावू देणार नाही असेही त्यांनी जाहीर केले. या परिषदेला कोल्हापूरसह सांगली, सातारा, पुणे, सोलापूरसह कर्नाटकातील शेतकरीही मोठ्या संख्येने उपस्थित होते. कंच म्हणते देत नाही..घेतल्याशिवाय राहत नाही अशा घोषणांनी शेतकऱ्यांनी परिसर दणाणून सोडला.
मागच्या हंगामातील ऊसाला ४०० रुपये द्यावेत या मागणीसाठी शेट्टी यांनी आक्रोश पदयात्रा काढली. त्यालाही कोल्हापूर-सांगली जिल्ह्यातील गावोगावी मोठा प्रतिसाद मिळाला. या पदयात्रेचा समारोप परिषदेच्याठिकाणी झाला. तिथे माजी खासदार शेट्टी यांनी आंदोलनाचा कृती कार्यक्रम जाहीर केला. ते म्हणाले, मी शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचे दाम मिळावे म्हणून २२ दिवस पायपीट केली परंतू राज्यातील सत्तारुढ व विरोधी गटानेही आमची दखल घेतली नाही.
कारखानदार जर शेतकऱ्यांना टनास ४०० रुपये देणार नसतील तर माझ्या शेतकऱ्याची दिवाळी गोड होणार नाही. म्हणून मी सुध्दा माझ्या स्वत:च्या घराकडे जाणार नाही. याच मैदानावर मी १५ नोव्हेंबरपर्यंत ठिय्या आंदोलन करणार आहे. धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन, पाडवा व भाऊबीज या चारही दिवशी शेतकऱ्यांनी कांदा, खर्डा-भाकर घेवून आपापल्या परिसरातील कारखान्यांच्या अध्यक्षांना नेवून द्यावी व त्यांना आमची दिवाळी तुमच्यामुळे खर्डा खावून होत असल्याची आठवण करून द्यावी असा कृती कार्यक्रम दिला.