देवरुखच्या कारागिराची आत्महत्या, कारण अस्पष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2019 10:18 AM2019-12-11T10:18:09+5:302019-12-11T10:19:38+5:30
देवरुख (जि. रत्नागिरी) येथील विष प्राशन केलेल्या सराफ कारागिराचा कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मंगळवारी मृत्यू झाला. राहुल शशिकांत नार्वेकर (वय २६) असे त्याचे नाव आहे. बहिणीच्या साखरपुड्यादिवशीच त्याचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
कोल्हापूर : देवरुख (जि. रत्नागिरी) येथील विष प्राशन केलेल्या सराफ कारागिराचा कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मंगळवारी मृत्यू झाला. राहुल शशिकांत नार्वेकर (वय २६) असे त्याचे नाव आहे. बहिणीच्या साखरपुड्यादिवशीच त्याचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
पोलिसांनी सांगितले, राहुल नार्वेकर हा सोनार कारागीर होता. सुरुवातीला तो मुंबईमध्ये होता. वडिलांचे निधन झाल्याने तो गावी देवरुखला आला. या ठिकाणी तो आई व बहीण यांच्यासोबत राहत होता. देवरुखमध्ये तो सराफी दुकानात कारागिराचे काम करीत होता. ४ डिसेंबरला त्याने राहत्या घरी विष प्राशन केले. त्याच्यावर रत्नागिरी येथील रुग्णालयात उपचार करण्यात आले.
प्रकृती अत्यवस्थ झाल्याने त्याला कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात दाखल केले. तिथे उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. त्याच्या बहिणीचे लग्न ठरले होते. घरामध्ये आनंदाचे वातावरण होते. मंगळवारी साखरपुडा असल्याने पै-पाहुणे आले होते. दरम्यान, सकाळी त्याचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेची लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.