खासगी सावकाराच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या, मृत महापालिकेचा कंत्राटी कर्मचारी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2022 01:07 PM2022-06-07T13:07:21+5:302022-06-07T13:07:50+5:30

व्याज, पैशांची परतफेड केली होती. मात्र, तरीही सावकारांकडून पैशांसाठी तगादा

Suicide due to harassment of private lender, contract employee of deceased corporation in kolhapur | खासगी सावकाराच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या, मृत महापालिकेचा कंत्राटी कर्मचारी

खासगी सावकाराच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या, मृत महापालिकेचा कंत्राटी कर्मचारी

Next

कोल्हापूर : खासगी सावकाराच्या त्रासाला कंटाळून महानगरपालिकेच्या कंत्राटी कर्मचाऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली. विनायक बाळासो सुर्वे (वय ५३, रा. चैतन्य अपार्टमेंट, माने गल्ली, मंगळवार पेठ) असे मृताचे नाव आहे. याबाबतची फिर्याद सिद्धी विनायक सुर्वे (वय ३९) यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार उमेश जाधव (रा. निवृत्ती चौक), बंटी महाडिक (रा. रामानंदनगर), श्रीकांत शंकरराव माने (रा. मंगळवार पेठ), मीनल पटेल (रा. पाचगाव) या चार संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, विनायक सुर्वे हे महानगरपालिकेच्या उद्यान विभागामध्ये कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करीत होते. त्यांच्या पत्नी सिद्धी खासगी नोकरी करीत होत्या. विनायक यांनी आर्थिक अडचणीमुळे गेल्या १५ वर्षांत खासगी सावकारांकडून व्याजाने पैसे घेतले होते. व्याज, पैशांची परतफेड केली होती. मात्र, तरीही मुद्दल, व्याजासाठी सावकारांकडून विनायक यांच्यामागे तगादा सुरू होता.

त्याला कंटाळून विनायक यांनी राहत्या घरी रविवारी दुपारच्या सुमारास गळफास घेण्याचा प्रयत्न केला. पत्नी सिद्धी यांनी विनायक यांना रोखले; पण काही वेळातच त्यांनी विषारी द्रव प्राशन केले. त्यांना उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले. सोमवारी दुपारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. दरम्यान, खाजगी सावकारांनी माझे पती विनायक यांना मानसिक त्रास देऊन, धमक्या देऊन त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार सिद्धी सुर्वे यांनी केली आहे.

Web Title: Suicide due to harassment of private lender, contract employee of deceased corporation in kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.