आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या
By admin | Published: October 13, 2015 11:31 PM2015-10-13T23:31:37+5:302015-10-13T23:44:05+5:30
वडिलांचे कर्ज माफ करा : परुळेकर
कोल्हापूर : भामटे (ता. करवीर) येथील महादेव पाटील यांनी चोला फायनान्सकडून घेतलेल्या चार लाख रुपयांच्या कर्जाच्या चिंतेने त्यांचा मुलगा जितेंद्र याने आत्महत्या केली होती. शासनाकडून चौकशी होऊन वारस म्हणून महादेव पाटील यांना एक लाखाची मदतही मिळाली आहे. त्यामुळे आपल्या कंपनीनेही त्यांचे कर्ज माफ करून त्यांची या संकटातून मुक्तता करावी, अशी मागणी जनता दल (सेक्युलर)चे महासचिव शिवाजीराव परुळेकर यांनी व्यवस्थापकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
राज्य शासनाने खासगी सावकारांची सुमारे १७१ कोटी रुपयांची कर्जे माफ केली आहेत. खासगी सावकार म्हणजे परवानाधारक सावकार व आपल्याही फायनान्स कंपनीला परवाना असणार आहे. त्यामुळे नैसर्गिक समान न्यायानुसार आपल्या कंपनीकडीलही शेतकऱ्यांची कर्जे माफ झाली पाहिजेत. भामटे येथील महादेव बापू पाटील यांनी आपल्या कंपनीकडून २७ फेब्रुवारी २०१४ रोजी ट्रॅक्टरसाठी चार लाख रुपये कर्ज घेतले होते. ते फेडण्याचा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न राहिला आहे. त्यामुळे त्यांनी थोड्याच कालावधीत एक लाख ४० हजार रुपये कर्ज फेडलेही आहे; परंतु पाटील यांचा मुलगा जितेंद्रला कंपनीचे कर्ज कसे फिटणार याची चिंता लागून राहिल्याने तो मानसिकदृष्ट्या खचला. त्यामुळे तणनाशक औषध पिऊन त्याने २० फेबु्रवारी २०१५ रोजी आत्महत्या केली. शासकीय चौकशी होऊन त्यांचे वारस म्हणून वडिलांना एक लाख रुपये शासकीय मदतही मिळाली आहे. ही वस्तुस्थिती असताना जितेंद्र पाटीलच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांकडे आपल्या कंपनीने तातडीने कर्जहप्त्याचा तगादा लावला असून, ट्रॅक्टर जप्तीची भीती दाखविली जात आहे. असे करणे संतापजनक असून, शासनाच्या धोरणाविरुद्धच आहे. हा प्रकार आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या वडिलांचे सांत्वन करण्याऐवजी त्यांना पुन्हा आत्महत्येस प्रवृत्त करण्यासारखा आहे. या सर्व वस्तुस्थितीचा विचार करून कंपनीने कर्ज माफ करावे; अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा उपनिबंधक यांना पाठविण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)