सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणानेच आत्महत्या : हसन मुश्रीफ
By admin | Published: June 10, 2017 03:58 PM2017-06-10T15:58:21+5:302017-06-10T15:58:21+5:30
राष्ट्रवादी कॉँग्रेसचा १८ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा
आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. १0 :राज्यातील भाजप सरकारच्या तीन वर्षातील कारभार हा शेतकरी विरोधी आहे. त्यामुळे शेतकरी देशोधडीला लागून आत्महत्येकडे वळला आहे, अशी टीका राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी शनिवारी येथे केली.
ताराबाई पार्क येथील पक्षाच्या जिल्हा कार्यालय येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या १८ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील होते. यावेळी आमदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते ध्वजारोहण व केक कापुन वर्धापन दिन साजरा करणेत आला. यावेळी राज्यातील भाजपा सरकारच्या शेतकरी कारभाराचा समाचार घेत हसन मुश्रीफ यांनी कडाडून टिका केली.
मुश्रीफ म्हणाले, या पुरोगामी महाराष्ट्रात शेतकरी कधी संपावर गेले नव्हते, पण ते ही घडत आहे ही लाजीरवाणी घटना आहे. राज्याच्या सरकारच्या तीन वर्षाच्या काळातील शेतकरी विरोधी कारभाराने शेतकरी कष्टकरी देशोधडीला लागला आहे. त्यामुळेच आत्महत्येकडे वळला आहे. नोटबंदीच्या निणर्यामुळे शेतमालाचे दर कोसळले, गारपीट, निसर्गाचा लहरीपणा आणि शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे न्यायासाठी शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे. त्यास राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठींबा असुन हा वर्धापनदिन शेतकऱ्यांना समर्पित करून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
जिल्हा सरचिटणीस अनिल साळोखे यांनी स्वागत केले. जिल्हाध्यक्ष मा ए वाय पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी माजी खासदार निवेदिता माने, आमदार संध्यादेवी कुपेकर, शेतकरी संघाचे अध्यक्ष युवराज पाटील, जिल्हा बॅँकेचे संचालक बाबासाहेब पाटील -असुर्लेकर, अमरसिंह माने पाटील, सर्जेराव पाटील गवशीकर , नेताजीराव पाटील, प्रकाश पाटील, डी बी पिष्ठे, बाळासाहेब खैरे, संगीता खाडे, संतोष धुमाळ, शिवानंद माळी यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.