kolhapur news: सुटी घेवून गावी आला, अन् २८ वर्षीय जवानाने टोकाचा निर्णय घेतला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2023 13:37 IST2023-01-20T13:35:54+5:302023-01-20T13:37:12+5:30
झोपण्यासाठी माडीवर गेलेल्या भावाला भाऊ उठवायला गेला, पण...

kolhapur news: सुटी घेवून गावी आला, अन् २८ वर्षीय जवानाने टोकाचा निर्णय घेतला
कोडोली : भारतीय लष्करात जवान असलेल्या काखे (ता. पन्हाळा) येथील सत्यजित महादेव खुडे (वय २८) याने गुरुवारी दुपारी घरी गळफास घेत आत्महत्या केली. याबाबतची फिर्याद त्याचा भाऊ सुनील खुडे याने पोलिसांत दिली असून, घटनेची नोंद कोडोली पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
कोडोली पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सत्यजित हा सात वर्षांपूर्वी लष्करी सेवेत दाखल झाला होता. त्याची जम्मू येथे नियुक्ती झाली होती. आता वडोदरा, गुजरात येथे त्याची बदली झाली होती. तो वडोदरा येथे रुजू होऊन एक महिन्याच्या सुटीवर १ जानेवारीला काखे येथे गावी आला होता. चार वर्षांपूर्वी त्याचा विवाह झाला होता. त्याला दोन वर्षांचा एक मुलगा आहे.
गुरुवारी दुपारी घरी तो माडीवर झोपण्यासाठी गेला होता. दुपारी तीनच्या सुमारास त्याचा भाऊ त्याला उठविण्यास गेला असता आत्महत्येची घटना लक्षात आली. सत्यजितला उपचारांसाठी तत्काळ कोडोली येथील यशवंत हॉस्पिटलमध्ये दाखल केले; परंतु उपचारांपूर्वी तो मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, आई, वडील व एक भाऊ आहे.