पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणाची आत्महत्या, वयोमर्यादेत अखेरची संधी
By उद्धव गोडसे | Published: April 16, 2024 09:27 PM2024-04-16T21:27:27+5:302024-04-16T21:27:39+5:30
अर्ज सबमिट न झाल्याच्या नैराश्यातून आत्महत्या केल्याचा नातेवाईकांचा आरोप
कोल्हापूर: पोलिस भरतीची तयारी करणा-या तरुणाने नैराश्यातून गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार महाडिकवाडी (ता. पन्हाळा) येथील घरात घडला. रंगराव बाळासो फाटक (वय २८, रा. महाडिकवाडी, पो. कसबा ठाणे) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. सर्व्हर डाऊनची तांत्रिक अडचण आणि कागदपत्रांची वेळेत पूर्तता होत नसल्याच्या नैराश्यातून आत्महत्या केल्याची माहिती त्याच्या नातेवाईकांनी आणि मित्रांनी दिली. पोलिस भरतीची त्याची अखेरची संधी होती.
सीपीआरमधून मिळालेल्या माहितीनुसार, पदवीधारक रंगराव फाटक हा महाडिकवाडी येथे आई, वडील, मोठा भाऊ आणि वहिणी यांच्यासोबत राहत होता. सैन्य दलात भरती होण्याचा त्याचा प्रयत्न अपयशी ठरला. वयोमर्यादा संपल्यानंतर त्याने पोलिस भरतीसाठी प्रयत्न सुरू केले. काही महिने तो आसुर्ले-पोर्ले (ता. करवीर) येथील एका ॲकॅडमीत भरतीची तयारी करीत होता. वयोमर्यादेनुसार खुल्या प्रवर्गातील रंगराव याच्यासाठी पोलिस भरतीची अखेरची संधी होती. त्यासाठी तो कसून सराव आणि अभ्यास करीत होता. अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी सोमवारी संकेतस्थळावर नोंदणी केल्यानंतर त्याला ओटीपी मिळाला नाही. यामुळे तो अर्ज भरू शकला नाही. तसेच काही कागदपत्रांची वेळेत पूर्तता होत नसल्याने तो निराश होता.
मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास घरात वरच्या मजल्यावर छताच्या फॅनला दोरीने गळफास घेतल्याच्या स्थितीत तो वडिलांना आढळला. तातडीने गळफास सोडवून त्याला सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मुदतीत अर्ज भरता न आल्याच्या नैराश्यातून त्याने आत्महत्या केल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. त्याचे वडील शेती करतात, तर भावाचे हार्डवेअर दुकान आहे. या घटनेची नोंद पन्हाळा पोलिस ठाण्यात झाली.