बिळाशीत शेतकऱ्याची कर्जाला कंटाळून आत्महत्या
By admin | Published: April 10, 2017 08:37 PM2017-04-10T20:37:11+5:302017-04-10T20:37:11+5:30
शिराळा तालुक्यातील पहिली घटना : आठ लाखांचे कर्ज
बिळाशी : बिळाशी (ता. शिराळा) येथील शेतकरी यशवंत शंकर साळुंखे (वय ५५) यांनी सोमवारी सकाळी आठच्या सुमारास कर्जाला कंटाळून गावातील वारणा चौकातील आडात उडी मारून आत्महत्या केली. शेतीसाठी घेतलेले सुमारे आठ लाख रुपयांचे कर्ज चुकवता न आल्याने त्यांनी मृत्यूला कवटाळले. कर्जाला कंटाळून शेतकऱ्याने केलेली ही आत्महत्या शिराळा तालुक्यातील पहिलीच घटना ठरली. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. यशवंत साळुंखे यांनी बँक आॅफ बडोदाच्या वाळवा शाखेतून सात लाख रुपये तसेच बिळाशी येथील सोसायटीकडून ८० हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यांची वडिलार्जित साडेचार एकर जमीन असून, एकत्रित कुटुंबाचे ते प्रमुख होते. त्यांचे आई, वडील वृध्द असून, ते घरातून बाहेर पडू शकत नाहीत. मुलगा बी. ए.च्या दुसऱ्या वर्षात शिकत आहे, तर मुलगी दीपाली हिचे दोन महिन्यांपूर्वीच लग्न झाले आहे. गेले महिनाभर यशवंत साळुंखे कर्जबाजारीपणामुळे नैराश्येत होते. कर्ज कसे फेडायचे आणि दारिद्र्य कधी संपायचे या विचारात ते पत्नीशी बोलायचे. ते सतत एकटेच बडबडत. सोमवारी सकाळी त्यांनी आठच्या सुमारास आडात उडी मारली. साळुंखे यांनी ज्या आडात उडी मारली, त्याला स्लॅब बांधण्यात आला आहे. ३ फूट बाय ३ फूट रुंदीचा दरवाजा ठेवला असून, यातून ग्रामस्थ पाणी उपसतात. या दरवाजातूनच साळुंखे यांनी आत उडी मारली. साळुंखे यांनी आडात उडी घेतल्याचे समजताच त्यांना वाचविण्यासाठी प्रवीण यमगर, संभाजी साळुंखे यांनी आडात उड्या मारल्या. परंतु आडात पाणी जास्त असल्याने त्यांना वाचविण्यात अपयश आले. ८० फूट खोल असणाऱ्या आडातील पाणी काढण्यासाठी दोन विद्युत पंप लावण्यात आले होते. दुपारी साडेतीनच्या सुमारास आडातील सर्व पाणी काढल्यानंतर साळुंखे यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. साळुंखे येथील वारणा गणेश मंडळाचे सक्रिय कार्यकर्ते होते. त्यांच्या जाण्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. चुलत बंधू विजय बाळकृष्ण साळुंखे यांनी कोकरुड पोलिसांत माहिती दिली. सहाय्यक पोलिस निरीक्षक भगवान शिंदे पुढील तपास करत आहेत. (वार्ताहर) गोठ्यात गाय, तर घरात आय पाहिजे! शेतीवाडीबरोबरच साळुंखे यांना खिलार गाय पाळण्याचा छंद होता. ‘गोठ्यात गाय, तर घरात आय पाहिजे, मग घरबी भरल्यासारखं आणि गोठाबी भरल्यासारखा...’ असे म्हणणाऱ्या यशवंत साळुंखे यांच्या जाण्याने गावावर शोककळा पसरली आहे.