बोळावीतील जवानाची उत्तराखंडमध्ये आत्महत्या
By admin | Published: November 23, 2014 12:50 AM2014-11-23T00:50:00+5:302014-11-23T00:50:00+5:30
सर्व्हिस रायफलने गोळ्या झाडल्या
सेनापती कापशी : बोळावी (ता. कागल) येथील जवान संतोष चंद्रकांत पोवार (वय २५) याने सर्व्हिस रायफलने गोळ्या झाडून घेऊन आत्महत्या केली. ही घटना उत्तराखंडमधील सीमा सुरक्षा दलाच्या युनिटमध्ये आज, शनिवारी सकाळी साडेपाच वाजता घडली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
याबाबत संतोष पोवार याच्या कुटुंबीयांनी दिलेली माहिती अशी : मुरगूड येथील शिवराज कॉलेजमध्ये बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर संतोष सीमा सुरक्षा दलात भरती झाला होता. दोन वर्षे भोपाळ येथे सेवा बजाविल्यानंतर गेल्या वर्षीपासून तो उत्तराखंडमध्ये कार्यरत होता. दसऱ्याला तो सुटीवर गावी आला होता. आज सकाळी पहाटे चार वाजता त्याने पुणे येथील बहिणीशी फोनवर चर्चा केली व साडेपाचच्या सुमारास युनिटमध्येच सर्व्हिस रायफलने गोळ्या झाडून आत्महत्या केली. सकाळी साडेसातच्या सुमारास उत्तराखंडमधील युनिटमधून संतोषच्या घरी फोनवरून या घटनेची माहिती देण्यात आली.
दोन वर्षांपूर्वी संतोषचा विवाह झाला होता. शांत व मनमिळावू स्वभावामुळे त्याचा मित्रपरिवार मोठा होता. त्याच्या पश्चात पत्नी, आई, वडील असा परिवार आहे. (वार्ताहर)